maharashtra

सातारा जिल्ह्यातील मुस्लीम समाजबांधवांनी दिला सामाजिक ऐक्याचा संदेश

आषाढी एकादशी व बेंदूर यादिवशी ठेवले कत्तलखाने तसेच दुकाने बंद

The message of social unity was given by the Muslim community in Satara district
जिल्ह्यातील मुस्लीम समाजबांधवांनी आषाढी एकादशी दिवशीच आलेल्या बकरा ईद या पारंपारिक सणाला फाटा देत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या सौहार्द्रतेचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

सातारा : जिल्ह्यातील मुस्लीम समाजबांधवांनी आषाढी एकादशी दिवशीच आलेल्या बकरा ईद या पारंपारिक सणाला फाटा देत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या सौहार्द्रतेचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
यावर्षी हिंदूंसाठी पवित्र असणारी आषाढी एकादशी आणि मुस्लिम समाजासाठी महत्त्वाचा असलेली बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले. मुस्लीम समाजाची जाणीव ठेवून शासनाने दि. 10 ते 12 या दिवशी कुर्बानी देण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, हिंदू धर्मियांच्या भावना लक्षात घेत सातार्‍यातील मुस्लिम बांधवांनी कोणत्याही मोठ्या कत्तली न करता कत्तलखाने व दुकाने बंद ठेवून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे.
मुस्लीम समाजासाठी बकरी (बकरा) ईद हा त्यांचा पारंपारिक सण. यादिवशी दिलेल्या कुर्बानीला अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र यावर्षी एकत्रित येणार्‍या आषाढी एकादशीचा मान ठेवून जिल्हाभर बैठका घेण्यात आल्या. त्यातून मुस्लीम समाजाने आषाढी एकादशी व बेंदूर यादिवशी कोणतीही कत्तल न करण्याचा तसेच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे हिंदू बांधवांनीही स्वागत केले. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखरसिंह, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी विशेष प्रयत्न केले.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष शफीक शेख, सदरबझार कत्तलखान्याचे सलीम बेपारी, सलीम मेमन, वसीम बेपारी, वाहिद बेपारी, आलीम कुरेशी, आयास कुरेशी, जुबेर कुरेशी व इतर मुस्लीम बांधव उपस्थित होते.