सातारा शहर परिसरात चोरट्यांचा धुडगूस सुरुच
60 हजार रुपयांच्या रकमेसह 2 लाख रुपये किंमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास
चोरट्यांनी याचीच संधी साधत अपार्टमेंटमधील तक्रारदार यांचा व प्रज्ञा भगवानराव सपाटे यांच्या घरी चोरी केली. ही घटना दि. 2 रोजी समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. तक्रारदार यांनी घरामध्ये पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त विखुरलेले होते.
सातारा : सातारा शहर परिसरात चोरट्यांचा धुडगूस सुरुच असून गोडोली येथील साईमंगल अपार्टमेंटमधील 2 फ्लॅट तर बॉम्बे रेस्टॉरंट येथील 1 टेक्स्टाईल टार्गेट केले. चोरट्यांनी रोख 60 हजार रुपयांच्या रकमेसह 2 लाख रुपये किंमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरुन नेला.
गोडोली येथील फ्लॅट चोरीप्रकरणी वैभव अनिल मस्के (वय 33, रा.गोडोली) यांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुध्द तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 1 रोजी तक्रारदार यांच्यासह काही जणांचे फ्लॅट बंद होते. चोरट्यांनी याचीच संधी साधत अपार्टमेंटमधील तक्रारदार यांचा व प्रज्ञा भगवानराव सपाटे यांच्या घरी चोरी केली. ही घटना दि. 2 रोजी समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. तक्रारदार यांनी घरामध्ये पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त विखुरलेले होते. या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पाहणी करुन ठसे तज्ञाला पाचारण केले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता घरातून चोरट्यांनी सोन्याचा ऐवज लांबवल्याचे समोर आले. यामध्येे 2 मिनी गंठण, 2 मोठे सोन्याचे गंठण, सोन्याचा नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, मनगट्या, कानातल्या रिंगा, चांदीचा छल्ला, टॉप्स, सोन्याची चेन, चांदीचे जोड अशाप्रकारे दोन्ही फ्लॅटमधील तब्बल 2 लाख रुपये किंमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला असल्याचे स्पष्ट झाले. पंचनाम्याची प्रक्रिया झाल्यानंतर पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
टेक्सटाईल येथील चोरीप्रकरणी राजेंद्रकुमार शामराव जगदाळे (वय 44, रा. सदरबझार) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांचे बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात चाहूर फाटा येथे चैतन्य टेक्सटाईल नावाचे दुकान आहे. दि. 2 रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. दि. 3 रोजी सकाळी 9 वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाचे लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी आतमध्ये जावून पाहणी केली असता ड्रॉव्हरमधील रोख 60 हजार रुपये, दोन डीव्हीआर व इतर साहित्य असे 1 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी झाल्याचे समोर आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करुन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, ऐन सणासुदीच्या दिवसात चोरट्यांनी घरफोड्यांचा सपाटा लावल्याने खळबळ उडाली आहे. दिवसासोबतच रात्रीची गस्त वाढवणे गरजेचे बनले आहे. मात्र पोलिसांच्या गस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे.


