maharashtra

गतीमान विकासासाठी सातारा विकास आघाडी कटिबद्ध : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले


Satara Vikas Aghadi committed for speedy development
सातारा विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सातारा शहरात अनेक बदल करण्यात आले. जगाबरोबरच सातारा शहरालाही कोरोनाचा मुकाबला करावा लागल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना नगरसेवकांना अनेक अडचणी आल्या मात्र त्याही परिस्थितीत कोरोना बाधित नागरिकांना सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा हात दिला.

सातारा : सातारा विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सातारा शहरात अनेक बदल करण्यात आले. जगाबरोबरच सातारा शहरालाही कोरोनाचा मुकाबला करावा लागल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना नगरसेवकांना अनेक अडचणी आल्या मात्र त्याही परिस्थितीत कोरोना बाधित नागरिकांना सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा हात दिला. कोरोनाची परिस्थिती बदलल्यानंतर आता सातारा शहरातील उर्वरित विकास कामे हाती घेण्यात आली असून भविष्यातही गतीमान विकासासाठी सातारा विकास आघाडी कटिबद्ध राहील अशी ग्वाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज सातारा येथे बोलताना दिली.
सातारा येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत  १५ लाख रुपयांचे शौचालय, सब मर्सीबल विद्युत मोटार बोरिंगला बसवणे, १ लाख ४५  हजार रुपये किमतीची पाण्याची टाकी, ८३ पंताचा गोट ते २०८ रविवार पेठ अखेर १५  लाख रुपये खर्चाचा रस्ता डांबरीकरण व पाईप गटर ,कच्ची किराणा स्टोअर ते सूर्यप्रभा हॉस्पिटल रस्ता  डांबरीकरण या विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सौ. सीता हादगे, पक्षप्रतोद दत्ता बनकर, माजी नगराध्यक्ष सतीश जाधव, डॉ. संदीप काटे, डॉ. सुहास पाटील डॉ. किरण जगताप, राम हादगे आदी मान्यवर उपस्थित होते.
उदयनराजे भोसले पुढे म्हणाले,  सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तात्काळ सातारा शहराचा विकास आराखडा तयार करून प्राधान्यक्रमाने कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे जवळपास सातारा शहरातील सर्वच रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. दुर्दैवाने जगासह सातारा शहरातही कोरोनाने मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव केला. नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोना निवारण कामासाठी जुंपली गेली. हे काम करीत असताना आमच्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली, मात्र त्याही परिस्थितीत आमचे अधिकारी-कर्मचारी सातारकर यांच्या सेवेत हजर होते. अशा कठीण प्रसंगी विकास कामे करण्यामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र तरीही सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी कोरोना बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या माध्यमातून शक्य तेवढी मदत करत प्रभागातील नागरिकांशी आपली नाळ कायम जोडून ठेवली.
नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सातारा विकास आघाडी विविध विकास कामे करीत आहे, अशी एक चर्चा सुरू झाले आहे. मात्र या चर्चेला काहीही अर्थ नाही. कोरोनाचा काळ संपुष्टात आल्यामुळे मंजूर झालेला व उपलब्ध निधी विकास कामावर मार्गी लावण्याचा हा हेतू असल्याचे उदयनराजे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी दिलीप साळुंखे, सावळा अण्णा पवार, अजय बैताडे, पंकज पवार, पिंटू जाधव, विठ्ठल इथापे, भरत पवार, बारकू शिकलगार, इमरान शिकलगार, विकास डांगे, डॉ. किरण जगताप राजू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.