maharashtra

आ. शिंदे समर्थकांनी फोडले राष्ट्रवादी कार्यालय


Shinde supporters blow up NCP office
जिल्हा बँक निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी सातारा शहरातील राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले. यानंतर या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी सातारा शहरातील राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले. यानंतर या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा बँक निवडणुकीतील जावळी सोसायटी गटात आ. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी होती. शिंदे बिनविरोध होण्यासाठी अनेक नेत्यांनी आणि पुढार्‍यांनी प्रयत्न करुनही शेवटी निवडणूक लागलीच. आ. शिंदे यांच्याविरोधात ज्ञानदेव रांजणे हे उभे होते. या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांचे आलेले आदेश आणि शिवेंद्रसिंहराजे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी घेतलेला पवित्रा यामुळे जिल्हा बँक निवडणुकीला अक्षरश: लोकसभा निवडणुकीचे स्वरुप प्राप्त झाले होते. घोडेबाजारही झाला. मात्र शशिकांत शिंदे आजारी पडल्याने ते गाफील राहिले आणि त्याचा फायदा रांजणे आणि मानकुमरे यांनी उचलला. त्यांनी या कालावधीत मतदारांना अज्ञातस्थळी धाडून आपला विजय पक्का केला होता. मात्र, तरीही शेवटपर्यंत काय होणार, याकडे राजकीय धुरिणांच्या नजरा लागल्या होत्या.
शेवटी आज सकाळी जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीत आ. शिंदे यांना 24, तर ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते पडली आणि आ. शिंदे यांचा केवळ एका मताने पराभव झाला. निकालाची बातमी बाहेर येवून धडकताच हा पराभव जिव्हारी लागल्याने आ. शिंदे समर्थकांनी सातारा राष्ट्रवादी भवनाकडे कूच केली. राष्ट्रवादी भवनावर कार्यकर्ते येताच त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयावर तुफान दगडफेक केली. कार्यकर्त्यांनी केलेल्या या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.