maharashtra

राजवाडा परिसरात भाजी विक्रेत्यांची रस्त्यावरच भांडणे

वाहतूक कोंडीचा मनःस्ताप, पालिकेची जप्तीची कारवाई

साताऱ्यातील राजवाडा परिसरात पथारी मांडण्यावरून भाजी विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. भांडण अगदी रस्त्यावर आल्याने ऐन वर्दळीच्या रस्त्यावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनःस्ताप सोसावा लागला.

सातारा : साताऱ्यातील राजवाडा परिसरात पथारी मांडण्यावरून भाजी विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. भांडण अगदी रस्त्यावर आल्याने ऐन वर्दळीच्या रस्त्यावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनःस्ताप सोसावा लागला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक घटनास्थळी आले. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी भाजीपाल्याच्या आठ ठिके व वजन काटे जप्त करण्याची कारवाई केली.
जवळपास तासभर चाललेल्या या वादावादीमुळे राजवाडा चौकात वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांचा याचा मनस्ताप सहन करावा लागला.
पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करुनही भाजी व फळविक्रेते रस्त्यावरच आपली गाडी उभी करतात. बुधवारी दुपारी राजवाडा बसस्थानकासमोरील रस्त्यावर बसणाऱ्या काही भाजी विक्रेत्यांमध्ये किरकोळ कारणांवरून बाचाबाची झाली. यानंतर हा वाद वाढतच गेला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने घटनस्थळी पाचारण केले. पथकाची गाडी चौकातच उभी राहिल्याने या चौकात वाहनांची चहूबाजुने कोंडी झाली. गर्दीतून कसाबसा मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागली. अतिक्रमण पथकाने या परिसरातील आठ भाजी विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले.