maharashtra

भुलतज्ञ संघटनेच्यावतीने सातारला एक मे रोजी जनजागृती प्रभातफेरी


Janajagruti Prabhatpheri on 1st May in Satara on behalf of Bhulatajna Sanghatana
भारतीय भूलतज्ञ संघटना यावर्षी आपला ७५ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने भारतीय भूलतज्ञ संघटना सातारा आणि भारतीय भूलतज्ञ संघटना महाराष्ट्र राज्य एकत्रितरित्या विविध जनजागृती कार्यक्रम हाती घेत आहे.

सातारा : भारतीय भूलतज्ञ संघटना यावर्षी आपला ७५ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने भारतीय भूलतज्ञ संघटना सातारा आणि भारतीय भूलतज्ञ संघटना महाराष्ट्र राज्य एकत्रितरित्या विविध जनजागृती कार्यक्रम हाती घेत आहे.
दि. एक मे रोजी सकाळी सात वाजता पोवई नाका ते नगरपालिका ते पोवई नाका अशी प्रभातफेरी होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल हे उपस्थित राहणार आहेत. यानंतर पोवई नाका परिसरात COLS म्हणजेच जीवन संजीवनी क्रियेचे विनामूल्य प्रात्यक्षिक आहे. अशा कार्यक्रमांमधून भूलशास्र या महत्वाच्या पण काहीशा दुर्लक्षित वैद्यकीय शाखेबद्दल जनतेला माहिती होईल असा विश्वास भारतीय भूलशास्त्र संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ अविनाश भोसले यांनी व्यक्त केला.
जीवन संजीवनी क्रियेबाबत माहिती देताना भारतीय भूलतज्ञ संघटना, सातारा सचिव डॉ वैशाली चव्हाण म्हणाल्या " विजेचा धक्का, हृदयविकाराचा झटका, अपघात, पाण्यात बुडणे अशा काही प्रसंगात कोणत्याही व्यक्तीचे ह्रदय व श्वास बंद पडू शकतो. अशावेळी कोणतेही वैद्यकीय साधने आणि ज्ञान नसलेली व्यक्ती सुद्धा तिच्या केवळ दोन हातांच्या साहाय्याने त्या रुग्णाचे प्राण वाचवू शकते. यामधे रुग्णाच्या छातीवर शास्त्रीय पद्धतीने दाब देण्याचे तंत्र असतें. याला Compression Only Life Support,- COLS असेही म्हणतात. हे प्रथमोपचार रुग्णाला हृदय बंद पडल्याच्या तीन मिनिटांत सुरू होणे महत्वाचे असते. अन्यथा ऑक्सीजनअभावी त्याचा मेंदू कायमस्वरूपी निकामी होऊ शकतो."
यामुळेच भारतीय भूलशास्त्र संघटना सामाजिक जाणिवेतून सबंध भारतभर नागरिकांना या जीवन संजीवनी क्रियेचे विनामूल्य प्रशिक्षण देत असते. आमचा उद्देशच मुळात प्रत्येक भारतीय जीवन संरक्षक असला पाहिजे असा आहे. भूलतज्ज्ञ संघटना सातारा गेली बारा वर्षे हे प्रशिक्षण मोफत घेत आहे. या कामाबद्दल सातारा शाखेला राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळाली आहेत, अशी माहिती डॉ अविनाश भोसले यांनी दिली.
दि एक मे च्या कार्यक्रमाला सातारकर नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.