आमदारांनी विरोधकांच्या पदाधिकार्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणे निंदनीय : आ. शशिकांत शिंदे
आ. महेश शिंदे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची पत्रकार परिषदेत केली मागणी
आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुका अध्यक्षांना खालच्या स्तरावर जात धमकी आणि कुटुंबीयांना मारण्याचा इशारा दिला, हे निंदनीय आहे. याबाबत आ. महेश शिंदे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथील पत्रकार परिषदेत केली.
सातारा : आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुका अध्यक्षांना खालच्या स्तरावर जात धमकी आणि कुटुंबीयांना मारण्याचा इशारा दिला, हे निंदनीय आहे. याबाबत आ. महेश शिंदे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथील पत्रकार परिषदेत केली.
आ. शिंदे म्हणाले, सत्य ज्यावेळी समोर येतं आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न झाला की त्याला दाबण्याचा प्रयत्न सध्या मतदारसंघात सत्तेच्या मस्तीत असलेले लोक करत आहेत. त्यांना लोकांनी काम करण्याची संधी दिली म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारे विरोध केला नाही. परंतु त्या असलेल्या संधीचा उपयोग जनहितासाठी करण्यापेक्षा त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने कार्यकर्ता, विरोधक अशा अनेकांना आपल्या अधिकारातून धमकाविण्याचा, संपवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेतून आमच्यावर आरोप केले, खरं म्हटलं तर त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून साहजिकच माझ्या सहकार्यांनी आरोप केलेले आहेत. ते आरोप केल्यामुळे चिडून जाऊन रात्री विद्यमान आमदाराने सोशल मीडिया अध्यक्षांना खालच्या स्तरावर जात धमकी आणि कुटुंबीयांना मारण्याचा इशारा दिला. हे कुठेतरी झाकण्यासाठी व्हाट्सअप द्वारे कॉल करून हा सगळा प्रताप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ज्यांनी त्यांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला अशा सगळ्यांना त्यांनी आणि त्यांच्या भगिनींनी धमकी आणि इशारा देण्याचा प्रयत्न केला. आजवर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो; परंतु रमेश उबाळे, प्रताप बोधे, निलेश कदम, सागर बर्गे, सूरज देवकर, साहिल शेख, वैभव पवार आणि अशा अनेक सर्व सामान्य कार्यकर्त्यांना, तरुण सहकार्यांना अशाप्रकारे धमकी देणे चुकीचे आहे. माझ्यावर आजवर अनेक प्रकारच्या जहालपणे बातम्या छापल्या. पण मी कधी कोणाला धमकी किंवा प्रत्युत्तर केलं नाही. लोकशाहीने प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्याने पूर्णपणे वापरावा. लोकांना पटलं तर लोक स्वीकारतील. परंतु यापुढे जरा अशा प्रकारची भाषा लोकप्रतिनिधी वापरत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.
याबाबत माझ्या सहकार्यांनी विविध ठिकाणी पोलीस चौकशीसाठी तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी चौकशी करून या बाबतीत समज द्यावी, कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जर पोलिसांनी लक्ष घातले नाही किंवा कुठेतरी सत्तेच्या मस्तीला आळा घातला नाही तर आम्हाला जशास तसे उत्तर द्यायला आम्ही सुद्धा समर्थ आहोत ! हा इशारा या माध्यमातून देतो. एवढेच नव्हे गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून अनेक कार्यकर्त्यांवर चौकशी, आरोप, गुन्हे दाखल करण्याचे सत्र चालू केले आहे, असेही आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


