maharashtra

शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करावा

माजी खासदार राजू शेट्टी यांची साताऱ्यात मागणी

Farmers should be provided daily power supply for agricultural pumps
शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करत असतो. तरीही त्याला पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्री जायला सांगणे, हे  मानवी हक्काचे उल्लंघन आहे. रात्री अपरात्री जंगली श्वापदांच्या हल्ला होण्याची तसेच सर्पदंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

सातारा : शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करत असतो. तरीही त्याला पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्री जायला सांगणे, हे  मानवी हक्काचे उल्लंघन आहे. रात्री अपरात्री जंगली श्वापदांच्या हल्ला होण्याची तसेच सर्पदंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
खा. राजु शेट्टी यांनी कमी दरातील वीज शेतकर्‍यांना दिवसा कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल, हे तज्ञांच्या मदतीने शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर शासनाने आयआयटीच्या तज्ञांची समिती गठीत करून याचा निर्णय पंधरा दिवसांत घेण्याचे आश्वासन दिले होते.  याबाबत खा. शेट्टी राज्यभर शेतकर्‍यांची जनजागृती करत आहेत. त्याचअनुषंगाने साताऱ्यात शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
याबाबत बोलताना खा. राजू शेट्टी म्हणाले की, शेतकरी दिवसा शेतीसाठी व रात्री पाण्यासाठी असा सलग 24 तास शेतामध्ये राबू शकत नाही. रात्री अपरात्री धोका पत्करून पाणी पाजताना शेतकर्‍यांवर अनेकदा जंगली जनावरांकडून हल्ले झाले आहेत. सर्पदंश होत असतात. शेतकर्‍याने बचाव केला तर त्याच्यावर वन विभागाकडून गुन्हे दाखल होतात. जर एखादा साप शेतकर्‍याकडून मारला गेला तर त्याच्यावर वन विभागाकडून कारवाई होते परंतु, सर्पदंश झाला तर मात्र सरपटणारा पाणी वन्यजीव नसल्याचे सांगत वन विभागाकडून हात वर केले जातात. यामुळे बळी गेलेल्या शेतकर्‍याच्या कुटुुबांना नुकसान भरपाई मिळत नाही. ज्या धरणातून वीज निर्मिती होते ती धरणे बांधण्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावाने सरकारने विकत घेतल्या होत्या. तसेच धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शेतकर्‍यांच्याच जमीनी घेतल्या. त्यामुळे शेतकर्‍यांना हक्काची वीज त्यांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र शेतकर्‍यांना वीज देताना शासन अडमुठी भूमिका घेत आहे. रात्रीची वीज ही कमी दराची असते जिचा दर प्रति युनिट 1.49 रुपयाच्या जवळपास असतो. तोच दर प्राईम टाइममध्ये 21.29 रुपयांपर्यंत असतो. हीच कमी दराची रात्रीची वीज शेतकर्‍यांना देऊन सरकार कमी दरात वीज देत असल्याचा आव आणत आहे तर दुसरीकडे मागणी वाढल्याचे सांगत विजेचा पुरवठा समतोल करण्याचे कारण सांगत दिवसा विज नाकारत आहे. यासाठी तज्ज्ञांकडून माहिती घेवून शेतकर्‍यांना उपलब्ध होणार्‍या 5600 मे. वॅट विजेचे वितरण करण्याचे स्लॉट कशा पद्धतीने करता येईल, हे शासनाला सादर केल्यानंतर प्रशासकीय अधिकारी निरुत्तर झाले व त्यांनी आयआयटी तज्ज्ञांची समितीत नेमून पंधरा दिवसांत निर्णय देण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्राईम टाईममध्ये खाजगी ऊर्जा निर्मिती प्रकल्पातुन महागडी वीज घेऊन सर्वसामान्य लोकांच्या माथी मारली जात आहे. हे ऊर्जा प्रकल्प सर्व अनेक नेतेमंडळीच्या मालकीचे आहेत. कुठलाही पक्ष याला अपवाद नाही. महाजनकोच्या प्रकल्पासह अनेक खाजगी उर्जा प्रकल्पही पाण्याची रॉयल्टी भरून सुरू आहेत. हे प्रकल्प अनेक राजकीय नेत्यांच्या मालकीचे आहेत. महाजनकोचे प्रकल्प बंद राहत असून हे खाजगी उर्जा प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाकडून महागडी वीज खरेदी करून सर्वसामान्यांच्या माथी मारली जात आहे.  महाजनकोचे प्रकल्प अनेक महिने बंद असले तरी खाजगी उर्जा मात्र, सुरू असतात. चांदोली धरणावर असलेल्या एका खाजगी प्रकल्प सुरू असताना महाजनकोचा प्रकल्प मात्र नऊ महिने बंद होता. ज्यावेळी मी याबाबत आवाज उठवला त्याच दिवशी महाजनकोचा प्रकल्प सुरू झाला.
येत्या आठ दिवसांत सर्वच उर्जा प्रकल्पात सुरू असताना भ्रष्टाचार मी बाहेर काढणार असून यातील बड्या धेंडांची नावे पुराव्यासह जाहीर करणार आहे. काही हजार कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.