maharashtra

अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली फसवणूक

शिवाजी उर्फ सचिन ससाणे यांचा सातार्‍यातील पत्रकार परिषदेत आरोप

अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो, असे सांगून पैसे घेतल्यानंतरही काम न करता व परत पैसे माघारी न देता फसवणूक केल्याचा आरोप शिवाजी उर्फ सचिन बाबूराव ससाणे (रा.वाई) यांनी सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला.

सातारा : अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो, असे सांगून पैसे घेतल्यानंतरही काम न करता व परत पैसे माघारी न देता फसवणूक केल्याचा आरोप शिवाजी उर्फ सचिन बाबूराव ससाणे (रा.वाई) यांनी सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला. मधुकर फल्ले यांच्याकडेही रक्कम दिली असल्याचे म्हटले असून याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
सचिन ससाणे म्हणाले, ते लेखक, दिग्दर्शक व निर्माता आहेत. दोन महिन्यांपूर्वी चित्रपट तयार करायचा असल्याचे ठरवून त्यासाठी अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांना घेण्यासाठी शिंदे यांचे सहकारी मधुकर फल्ले यांच्यासोबत चर्चा केली. प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनाही चित्रपटाची स्क्रीप्ट सांगण्यात आली. कामाचा मोबदला म्हणून प्रती दिवस 1 लाख रुपये घेणार असल्याचे ठरले. पाच दिवसांचे काम असल्याने त्या बदल्यात रोख 4 लाख रुपये व 1 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. पैसे देताना सयाजी शिंदे यांनी व्हाउचरवर सह्या केल्या आहेत. मात्र व्यवहाराबाबत कॉन्ट्रॅक्ट झाले नसल्याची माहिती ससाणे यांनी दिली.
सचिन ससाणे पुढे म्हणाले, चित्रपटाचे काम सुरु झाल्यानंतर मात्र स्क्रीप्टमध्ये सयाजी शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्यास सांगण्यास सुरुवात केली. ही बाब मला पटली नाही. यातूनच पुढे सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करणार नसल्याचे सांगितले व 5 लाख रुपये परत देतो, असे सांगितले. तसेच ससाणे यांनी शिंदे यांच्या शुटिंगवेळी लावण्यात आलेल्या सेटचाही मोबदला देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग असल्याचे ससाणे यांनी सांगितले. मात्र पैसे देतो असे सांगूनही सयाजी शिंदे व मधुकर फल्ले पैसे देत नसल्याने दि. 1 डिसेंबर रोजी वाई पोलिस ठाण्यात त्याविरुध्द तक्रार अर्ज देण्यात आला. पोलिस अद्याप गुन्हा दाखल करत नसल्याने रविवारी ससाणे यांनी सातार्‍यात पत्रकार परिषद घेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.