maharashtra

वर्धनगड येथील महामार्गाचे काम दीर्घकाळानंतर पूर्णावस्थेकडे


Work on the highway at Vardhangad is nearing completion
वर्धनगड एसटी स्टॉप परिसरातील व वर्धनगड घाटातील अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम या दोन किलोमीटर अंतरामध्ये अनेक लहान मोठ्या अपघातानंतर मेघा प्रायव्हेट कंपनी लिमिटेड यांनी सुरू केले असून पंधरा दिवसांमध्ये रस्ता पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पुसेगाव : वर्धनगड एसटी स्टॉप परिसरातील व वर्धनगड घाटातील अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम या दोन किलोमीटर अंतरामध्ये अनेक लहान मोठ्या अपघातानंतर मेघा प्रायव्हेट कंपनी लिमिटेड यांनी सुरू केले असून पंधरा दिवसांमध्ये रस्ता पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सातारा-लातूर 548c या महामार्गाचे काम गेली दोन वर्षे चालू आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत होते आणि आजही पुलाच्या ठिकाणी काम अपूर्ण आहे. परंतु सातारा-पुसेगाव दरम्यान वर्धनगड ते रामोशीवाडी रस्ता उखडून टाकल्यानंतर आजपर्यंत हे काम अपूर्ण अवस्थेत होते. या परिसरात अनेक अपघात झाले. परंतु गेंड्याचे कातडे पांघरलेल्या मेघा प्रायव्हेट कंपनीला या कामाच्या बाबतीत सूर गवसला नव्हता. परंतु गेल्या एक-दोन  महिन्याभरात वर्धनगड घाटाच्या पहिल्याच कॉर्नरवर एक कार दोनशे फूट दरीत ढासळली, त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक ट्रॅक्टर-ट्रॉली उसासह दीडशे ते दोनशे फूट दरीत गडगडत गेली. सुदैवाने ड्रायव्हरने उडी मारल्याने जीवित हानी झाली नाही. तर मागील आठवड्यात एक ट्रॅक्टर ट्रॉली धावजी पाटील  मंदिराशेजारी पुलावरून 50 फूट खोल खाली पडली. याखेरीज छोटे-मोठे अपघात दहा ते पंधरा हून अधिक झाले असतील. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण वाहनांची व शेतकऱ्यांच्या उसाची वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. खडतर रस्त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनासह, प्रवाशांनाही मोठी हाल-अपेष्टा सोसावी लागली दोन वर्षाच्या मोठ्या प्रदीर्घ काळानंतर येथील काम पंधरा दिवसांमध्ये पूर्णत्वाकडे जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने, वाहनधारकांसह, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे.