वाचन संस्कृती वाढवणारी उपक्रमशील ग्रंथालये हवीत
दत्ताजी थोरात यांचे प्रतिपादन; एस आर रंगनाथन जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धांचा शानदार शुभारंभ
वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणारी उपक्रमशील ग्रंथालये ही काळाची गरज आहे. उपक्रमशील ग्रंथालयांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कार द्यावा, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील कन्याशाळा शालेय समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक दत्ताजी थोरात यांनी केले.
सातारा : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या पिढीचा ओढा हा मोबाईल गॅझेटकडे वाढत असून त्यांना वाचन संस्कृतीची परंपरा सांगणाऱ्या ग्रंथालयांकडे वळविणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरता वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणारी उपक्रमशील ग्रंथालये ही काळाची गरज आहे. उपक्रमशील ग्रंथालयांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कार द्यावा, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील कन्याशाळा शालेय समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक दत्ताजी थोरात यांनी केले.
आगामी ऑगस्ट महिन्यामध्ये एस आर रंगनाथन जयंतीनिमित्त येथील कन्या शाळेमध्ये शताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कथाकथन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, पुस्तक परिक्षण स्पर्धा यांचा समावेश होता. आंतरशालेय स्पर्धांमध्ये सातारा शहरातील वेगवेगळ्या शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कन्या शाळेच्या दर्शनी सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुरेखा दौंडे, उपमुख्याध्यापक चंद्रकांत ढाणे, बीसीए कॉलेजच्या प्राचार्य व संस्थेच्या आजन्म सेविका समीक्षा निकम आणि कन्या शाळेचा शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होता.
दत्ताजी थोरात पुढे म्हणाले, उपक्रमशील ग्रंथालय ही काळाची गरज आहे. मोबाईल गॅझेट ही आजच्या आधुनिक युगाची ओळख आहे. आजच्या पिढीला त्याचा सातत्याने मोह पडत असून ती पिढी वाचनापासून दूर जात आहे. वाचनाचा तो संस्कार त्यांच्यात रुजवण्यासाठी ग्रंथालयांनी उपक्रमशील होणे गरजेचे आहे. सातारा कन्या शाळेच्या ग्रंथालयात वाचन संस्कार देणारे विविध उपक्रम राबवले जातात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच या निमित्ताने आयोजित वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आवर्जून भाग घ्यावा. यामध्ये जिंकणे किंवा बक्षीस मिळवणे हा हेतू नाही. स्पर्धेमध्ये सहभागी होणे ही तुम्ही सिद्ध असल्याची एक जाणीव आहे. जो कोणत्याही आव्हानांसाठी सिद्ध होत नाही त्याच्या मधल्या जाणिवा विकसित होत नाहीत. जिंकण्यापेक्षा सतत वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नशील राहण्याचा गुण अंगी बाणवला जातो. म्हणून विद्यार्थ्यांनी सतत उपक्रमशील स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन दत्ताजी थोरात यांनी केले.
मुख्याध्यापिका सुरेखा दौंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एकूण एकशे वीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अमित शेलार, वासंती भोसले, सुजाता आगाशे, अॅडवोकेट सुचित्रा घोगरे काटकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व स्वागत गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापिका सुरेखा दौंडे व इतर उपशिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल रूपाली राक्षे यांनी केले व सुप्रिया चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.


