maharashtra

महागाव च्या ठगाला खाकीचा हिसका दाखवणार कोण ?

हमखास उत्पन्न योजनेच्या तपासात पोलिसांची टाळाटाळ; लाखो रुपयांची फसवणूक

Who is going to show Khaki's snatch to Mahagaon's swindler?
लाखो रुपयांचे सुरक्षित उत्पन्न देण्याच्या अमिषा पोटी सातारा शहर आणि तालुक्यातील शेकडो महिलांना फसविणार्‍या महागाव, ता. सातारा येथील महाठगाला कायद्याचा हिसका दाखविण्याची गरज आहे. सातारा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्यामुळे लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या महिलांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.

सातारा : लाखो रुपयांचे सुरक्षित उत्पन्न देण्याच्या अमिषा पोटी सातारा शहर आणि तालुक्यातील शेकडो महिलांना फसविणार्‍या महागाव, ता. सातारा येथील महाठगाला कायद्याचा हिसका दाखविण्याची गरज आहे. सातारा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्यामुळे लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या महिलांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये डझनावारी गुन्हेगारांना मोक्का सारख्या धडक कारवाया करून संघटित गुन्हेगारीचा बिमोड केला. मात्र आर्थिक फसवणूक करणारे शेकडो महाठक सातार्‍यात तळ देऊन आहेत. त्यांचा बंदोबस्त कधी होणार? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. महागाव, तालुका सातारा येथील स्वप्निल नारायण कुलकर्णी या गृहस्थाने सातारा शहर आणि शाहूपुरी परिसरातील शेकडो महिलांना सुरक्षित गुंतवणुकीचे नावाखाली लाखो रुपयांना फसविले आहे. भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवणार्‍या या भामट्याने ही रक्कम घेऊन पोबारा केल्याने गुंतवणूक केलेल्या महिलांच्या हाती फसवणुकीचा वरवंटा आला आहे  
मध्यंतरीच्या काळात स्वप्निल ने महिला बचत गटासाठी हमखास उत्पन्न योजना जाहीर केली होती. या योजनेच्या जाहिरातबाजीला भुलून शाहूपुरी परिसरातील अनेक बचत गटाच्या महिलांनी कुलकर्णी यांच्याकडे छोट्या-मोठ्या रकमा गुंतवायला सुरुवात केली. बैठकीमध्ये तो भामटा बदेवाडी, ता. वाई येथे खोलेश्वर डेअरी फार्म नावाचा गाईंचा गोठा असल्याचे महिलांना सांगायचा. महिलांनी या योजनेत 50 हजार रुपये गुंतवल्यास गाय खरेदी आणि तिच्या पालन-पोषणातून दरमहा चार हजार रुपये उत्पन्न मिळेल, अशा लेखी कराराचे आश्वासन द्यायचा. खोलेश्वर को-ऑपरेटिव बँक ही आपली स्वतःची बँक असल्याच्या भूलथापा त्याने महिलांना दिल्या होत्या. मात्र काही दिवसानंतर स्वप्निल कुलकर्णी याने दिलेल्या भुलथापा समोर यायला लागल्या. खोटे शिक्के, बनावट कागदपत्रे, खोटी आश्वासने याची पोलखोल काही महिलांनी केली. खोलेश्वर सहकारी बँक नावाची कोणतीही बँक नसल्याचे महिलांनी केलेल्या चौकशीत समोर आले. एकट्या शाहूपुरीतील एकाच कॉलनी मध्ये राहणार्‍या सुमारे दहा महिलांची पाच लाख रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचे यामध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास शाहूपुरी पोलिसांकडे आहे. मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने हा तपास गांभीर्याने घ्यायला पाहिजे तो अद्याप घेतलेला नाही. कुलकर्णी याने महिलांना आपण खरेदी केलेल्या गायींच्या पालन-पोषणावर लक्ष ठेवण्यासाठी एक ऑनलाईन लिंक आहे, असे सांगितले होते. या लिंक च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गायीवर लक्ष ठेवू शकता, असेही सांगितले. मात्र या सगळ्या भूलथापा देऊन कुलकर्णी गायब झाला.
शहरातील सदरबझार परिसरात वास्तव्यास असलेल्या एका कुटूंबालाही अशीच बनवाबनवी करुन कुलकर्णी याने आपल्या जाळ्यात ओढले. त्यांचा विश्‍वास संपादन करुन त्यांनाही या भामट्याने 4 लाख 14 हजारांना गंडा घातला आहे. या कुटूंबाला त्याने खोटे धनादेश दिले आहेत. त्याबाबतची फिर्यादही पोलीस ठाण्यात संबंधितांकडून नोंदविण्यात आली आहे.
सातारा पोलिसांकडे सुद्धा अद्यापही कुलकर्णीचा ठावठिकाणा मिळालेला नाही. सदर पीडितांची अवस्था अत्यंत विचित्र झाली असून फसवणूक तर झालीच शिवाय पैसाही गेला आणि कायद्याकडूनही म्हणावा तसा तपासाचा पाठिंबा मिळत नसल्याने सदर पीडित घायकुतीला आले आहेत. थेट पोलिस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली काम करणारी स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखा या दोन शाखांच्या कार्यक्षमतेवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह उभी राहिले आहे. हे पोलीस नक्की काय तपास करतात? या फसवणुकीचे गांभीर्य त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे काय? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी या बनावट परतावा प्रकरणाचा मुळापासून तपास करून या स्वप्निल कुलकर्णी नावाच्या भामट्याच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी सातारा शहर परिसरातून होत आहे. आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभार्‍यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.