maharashtra

किरपेतील बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

ग्रामस्थांनी सोडला सुस्कारा : ग्रामस्थांना सुगावा लागण्याआधीच वनविभागाने बिबट्याला अन्यत्र हलवले

The leopard in the kirpe is finally trapped in the cage of the forest department
किरपे, ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. 26 जानेवारी रोजी पहाटे ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेत अन्यत्र हलवले आहे.  

कराड : किरपे, ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. 26 जानेवारी रोजी पहाटे ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेत अन्यत्र हलवले आहे.  
येथील मौवटी नावाच्या शिवारात नारायण मंदिराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी ग्रामस्थ विद्याधर देवकर, आनंदा देवकर, ठाणे पोलीस पाटील प्रवीण तिकवडे यांना बोलावून बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याचे दाखवले. त्यानंतर इतर ग्रामस्थांना याबाबतची कल्पना येण्याआधीच ग्रामस्थांचा उद्रेक टाळण्याच्या हेतूने वनविभागाने बिबट्याला अन्यत्र हलवले आहे. 
दरम्यान, गुरुवारी २० रोजी सायंकाळी किरपे येथील शेतात बिबट्याने राज धनंजय देवकर या ५ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याला प्रतिकार केल्याने ते बिबट्याच्या तावडीतून मुलाचा प्राण वाचवण्यात यशस्वी झाले. 
त्यानंतर वनविभागाने तात्काळ हालचाली गतिमान करत परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र, बिबट्याने पिंजऱ्याला एक-दोन वेळा गुंगारा दिल्याचे दिसून आले. बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याच्या दोन दिवसानंतरच परिसरात शनिवार दि. 22 रोजी ऊसतोड मजुरांना बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत होती.
अखेर बुधवार दि. 26 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. त्यानंतर  वनविभागाने ग्रामस्थांना याचा सुगावा लागण्याआधीच ग्रामस्थांचा संभाव्य उद्रेक टाळण्याच्या हेतूने तात्काळ बिबट्याला अन्यत्र हलवले आहे. दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी ही सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.