साताऱ्यातील कंपनीच्या संचालकांनी थकवला १९ कोटी ३९ लाखांचा शासकीय कर
राज्यकर उपायुक्तांच्या तक्रारीनंतर तिघांवर गुन्हा
सातारा येथील एका कंपनीच्या तीन संचालकांनी १९ कोटी ३९ लाख ५९ हजार २९३ रुपयांची शासकीय कराची रक्कम शासकीय तिजोरीत न भरल्याने त्यांच्या विरोधात राज्यकर उपायुक्तांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वानवडी, पुणे येथील जिंदाल कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा येथील एका कंपनीच्या तीन संचालकांनी १९ कोटी ३९ लाख ५९ हजार २९३ रुपयांची शासकीय कराची रक्कम शासकीय तिजोरीत न भरल्याने त्यांच्या विरोधात राज्यकर उपायुक्तांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वानवडी, पुणे येथील जिंदाल कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यकर उपायुक्त साई तुषार वाघचौरे वाघचौरे वय ४३, राहणार चंद्रभागा गार्डन, शाहूनगर, सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कोडोली, ता. सातारा येथील औद्योगिक वसाहत परिसरात मे जय माता इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी कार्यरत आहे. या कंपनीचे संचालक म्हणून ज्योती अशोक जिंदाल, रोहित अशोक जिंदाल आणि अशोक सवरलाल जिंदाल सर्व रा. लव्हेंडर विंग, रहेजा गार्डन, वानवडी, पुणे हे कामकाज पाहतात.
या संचालकांनी २०१३- १४ ते २०१६- १७ या कालावधीतील विक्रीकर थकबाकी रुपये १९ कोटी ३९ लाख ५९ हजार २९३ एवढी आहे. त्यांना वेळोवेळी सांगून नोटीस पाठवून ते शासकीय कराची थकबाकी शासनाच्या तिजोरीत भरत नसल्याने शासनाची मोठी हानी झाली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर २००२ कलम ७४ ( २ ) नुसार जिंदाल कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अद्याप जिंदाल कुटुंबियातील कोणालाही अटक करण्यात आली नाही.


