शिवसैनिकांचा वडुज तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा
कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुजलेल्या पिकाचे तोरण बांधून सरकारचा निषेध
पन्नास खोके... या सरकारचं करायचे काय... शिंदे सरकार हाय हाय...शेतक-यांना दिलासा देत नाय.. अशा घोषणा देत खटाव तालुक्यातील वडूज येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी वडूज तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुजलेल्या शेतातील पिकाचे तोरण बांधून सरकारचा निषेध नोंदवला.
सातारा : पन्नास खोके... या सरकारचं करायचे काय... शिंदे सरकार हाय हाय...शेतक-यांना दिलासा देत नाय.. अशा घोषणा देत खटाव तालुक्यातील वडूज येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी वडूज तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुजलेल्या शेतातील पिकाचे तोरण बांधून सरकारचा निषेध नोंदवला.
सातारा जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पडलेल्या परतीचा पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खटाव, माण तालुक्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी वडूज येथे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन छेडलं.
शिवसैनिकांनी शेतात कुजलेली शेतीपिके तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला बांधून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई प्रशासनाने द्यावी अशी मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात सातारा जिल्हाप्रमुख प्रतापराव जाधव, तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्यासह मोठया संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.


