सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या तोतया सैनिक अधिकाऱ्यास अटक
सैन्य दलाच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे यश
भारतीय सैनिक दलाचा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून अधिकारी असल्याचे भासवून युवकांना सैन्य दलात नोकरी लावतो असे आम्ही दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया सैनिक अधिकाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
सातारा : भारतीय सैनिक दलाचा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून अधिकारी असल्याचे भासवून युवकांना सैन्य दलात नोकरी लावतो असे आम्ही दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया सैनिक अधिकाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
प्रवीण शिवाजी मरगजे, रा. कानवडी, ता. खंडाळा, जि. सातारा असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. ४ एप्रिल रोजी कानवडी, ता. खंडाळा येथील एक इसम सैन्यदलात नोकरीत नसतानाही भारतीय सैन्य दलाचा गणवेश घालून माण- खटाव परिसरातील युवकांना सैन्यदलात भरती करतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडे पैशाची मागणी करून त्यांची फसवणूक करत आहे अशी माहिती भारतीय सैन्य दलास मिळाली. संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब पोलीस अधीक्षक अजय बंसल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना संबंधित इसमाला अटक करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यानच्या काळात सचिन सुभाष खरात, रा. सिंधी बुद्रुक, ता. माण, मनीषा मनोज निकाळजे, रा. डांबेवाडी, ता. खटाव, आप्पासाहेब भिकु जाणकर रा. शिंगाडवाडी, ता. खटाव यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.
तोतया सैनिक अधिकाऱ्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना तो इसम त्याच्या गावात आला असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने युवकांना सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन युवकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली.
या कारवाईमध्ये उत्तम दबडे, तानाजी माने, विश्वनाथ सपकाळ, संतोष सपकाळ, शरद बेबले, मंगेश महाडीक, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, निलेश काटकर, शिवाजी भिसे, स्वप्निल माणे, केतन शिंदे, रोहित निकम आदींनी सहभाग घेतला.


