maharashtra

फलटणमध्ये सापडले नवजात स्त्री जातीचे अर्भक


फलटणमध्ये नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले असून हे अर्भक बाल शिशुगृहात पुढील संगोपनासाठी दाखल केले आहे.

फलटण : फलटणमध्ये नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले असून हे अर्भक बाल शिशुगृहात पुढील संगोपनासाठी दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एक महिला तिच्या हातामध्ये नवजात बालक घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने येताना दिसली म्हणून पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने सांगितले की, मी सिंधूबाई अंबादास शिंदे वय -60 वर्षे. मी माझ्या शेळ्या चारण्यासाठी राव रामोशी पूल फलटण येथील कॅनॉल च्या कडेला गेली असता बाळ रडण्याचा आवाज आल्याने हे बाळ मला कोणीतरी उघड्यावर ठेवलेले दिसले. म्हणून मी त्यास पोलीस स्टेशनला घेऊन आले आहे.
त्यानंतर पोलिसांनी महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड यांच्याशी संपर्क साधून सदर नवजात बालिका (अंदाजे वय दोन ते तीन दिवस) हिची उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे वैद्यकीय तपासणी करून पुढील संरक्षण व संगोपन कामी तिला बाल कल्याण समिती सातारा यांच्या समोर सादर करून त्यांचा तसा लेखी रिपोर्ट घेऊन बाल शिशुगृह म्हसवड तालुका माण येथे पुढील संगोपन कामी दाखल केले आहे.
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक दादासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दीपाली गायकवाड, अनिता कांबळे, संध्या वलेकर, धनंजय घाटगे, ज्ञानेश्वर मुळीक, सतीश दडस, दिग्विजय सांडगे, मपोशि तांदळे महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.