maharashtra

पालिकेच्या प्रशासकीय सभेमध्ये 181 विषयांना मंजूरी

तीन विषय प्रशासकीय कारणांसाठी रद्द

विषयांच्या अपूर्ण टिपण्या आणि भरमसाठ विषयांची जंत्री करत सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेने तब्बल 181 विषयांना शुक्रवारी मंजूरी दिली.

सातारा : विषयांच्या अपूर्ण टिपण्या आणि भरमसाठ विषयांची जंत्री करत सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेने तब्बल 181 विषयांना शुक्रवारी मंजूरी दिली. बांधकाम विभागासाठी आठ कंत्राटी अभियंते, सातारा शहरात सहा नो फ्लेक्स झोन, सार्वजनिक ठिकाणी फलक लावल्यास दहा हजार रुपये दंड अशा महत्वपूर्ण विषयांना हिरवा कंदिल मिळाला. मात्र काही विषयांच्या टिपण्या परिपूर्ण नसताना ते विषय अजेंडयावर कसे आले हा प्रश्न मात्र उपस्थित झाला.
सातारा पालिकेच्‍या झालेल्‍या प्रशासकीय सभेत तीन विषय वगळता १८१ विषय एकमताने मंजूर करण्‍यात आले. सभेपुढे मांडण्‍यात आलेले तीन विषय प्रशासकीय कारणास्‍तव रद्द करण्‍यात आले. हि सभा पालिकेचे मुख्‍याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली.
लोकनियुक्‍त कार्यकारिणीची मुदत गतवर्षीच्‍या डिसेबर महिन्‍यात संपल्‍याने सातारा पालिकेचा कारभार प्रशासकाच्‍या देखरेखीखाली सुरु आहे. प्रशासकीय कालावधीत शहरासह विस्‍तारीत भागातील विकासकामांना गती मिळावी, यासाठी प्रशासकीय सभांचे आयोजन करण्‍यात येत आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे प्रशासकीय सभेचे आयोजन अभिजित बापट यांच्‍या अध्‍यक्षतेखाली करण्‍यात आले होते.
सभेसाठी १८४ विषयांचा समावेश असणारी विषय पत्रिका तयार करण्‍यात आली होती.
दुपारी चार वाजता समिती सभागृहात या सभेला सर्व विभागप्रमुखांच्‍या उपस्‍थितीत सुरुवात झाली. सभेदरम्‍यान पत्रिकेवरील एक विषय यापुर्वी जिल्‍हा नियोजन समितीने मंजूर केला असल्‍याने, तर दोन विषय फेर असल्‍याने रद्द करण्‍यात आले. हे तीन विषय रद्द केल्‍यानंतर उर्वरित १८१ विषयांचे वाचन सभा अधीक्षक अतुल दिसले यांनी सभागृहापुढे केले. हे सर्व विषय विभागप्रमुखांनी एकमताने मंजूर केले. नो फ्लेक्स झोनची तत्काळ अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे पोवई नाक्यावरील शिवतीर्थ परिसराला फलकांपासून मुक्ती मिळाली आहे. शहरात असे सहा नो फ्लेक्स झोन तयार करण्यात येणार आहेत. सभेपुढे मांडण्‍यात आलेल्‍या अनेक विषयांच्‍या टिपण्‍या तयार नसल्‍याचे समोर आल्‍यानंतर त्‍याची तात्‍काळ पुर्तता करण्‍यात आली. मंजूर विषय आणि त्‍यात सुचविण्‍यात आलेली विकासकामे येत्‍या काही दिवसांत सूरु होतील, अशी माहिती पालिकेतून देण्‍यात आली.