maharashtra

कराडात महामार्ग जाम : पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची कोंडी


Highway jam in Karad: Conflict of servants returning to Pune-Mumbai
शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच दैना उडाल्याचे चित्र दिसून आले.

कराड : शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच दैना उडाल्याचे चित्र दिसून आले. महामार्गावर सकाळी ११ वाजल्यापासून महामार्गावर वाहतूक जाम होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत साधारण हेच चित्र कायम होते. त्यामुळे स्थानिकांची चांगलीच त्रेधा उडाल्याचे दिसून आले.
कराड हे मध्यवर्ती केंद्र असून वाहतुकीच्या दृष्टीनेही महत्वाचे ठिकाण आहे. पुणे-बेंगलोर महामार्गासह कराड-चिपळूण, कराड-रत्नागिरी, कराड-विजापूर, कराड-सोलापूर या मार्गावरीलही मोठ्या प्रमाणात वाहतूक कराडमार्गे होते. तसेच सध्या अनेक राज्यमार्गांचे काम सुरु असल्यानेही अनेक प्रवाश्यांनी कराडमार्गे पुण्या-मुंबईला जाण्यासाठी पसंती दर्शवली. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडल्याचेही दिसून आले.
या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरून कराड शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांचीही मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही वाहनधारकांना कोल्हापूर नाक्यावरून परत मलकापूरला जात पूर्वेकडील सेवा रस्त्याने वळसा घालून शहरात यावे लागले. त्यामुळे सर्व रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागण्याचे दिसून आले.
दरम्यान, येथील कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाणपूल व्हावा, अशी अनेक वर्षांपासुन स्थानिक व प्रवाश्यांची मागणी आहे. नुकतेच केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावित पुलाचा प्रश्न मार्गी लावला असून त्यासाठी भरीव निधी मंजूर केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. मात्र, या उड्डाणपुलाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात व्हावी, अशी मागणीही स्थानिकांकडून पुन्हा होऊ लागली आहे.