'निर्भया'ने दिले गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना 'गुड टच, बॅड टच'चे धडे
निर्भया पथक फलकाचे आंचल दलाल यांच्या हस्ते अनावरण
सातारा जिल्हा पोलीस व गुरुकुल स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने सातारा शहरात निर्भय निर्भया फलक उभारण्यात आले आहेत. गुरुकुल शाळा परिसरातील निर्भया पथक फलकाचे अनावरण सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. सहाय्यक पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांच्या पुढाकाराने ही योजना राबवण्यात आली आहे.
सातारा : सातारा जिल्हा पोलीस व गुरुकुल स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने सातारा शहरात निर्भय निर्भया फलक उभारण्यात आले आहेत. गुरुकुल शाळा परिसरातील निर्भया पथक फलकाचे अनावरण सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. सहाय्यक पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांच्या पुढाकाराने ही योजना राबवण्यात आली आहे.
पोलिस दलाच्या वतीने महिला व मुलींच्या सुरक्षेसंबंधी निर्भया पथक कार्यरत आहे. संकटाच्या वेळी महिलांनी आत्मसुरक्षा कशी साधावी, याचे मार्गदर्शन आज दलाल यांनी केले. गुरुकुल स्कूलच्या वतीने अजिंक्यतारा किल्ला रोड, आमराई परिसर, अजिंक्य बाजार चौक, एसटी कॉलनी, टेलिफोन एक्सचेंज कार्यालय, गुरुकुल स्कूल परिसरात निर्भया पथक फलक उभारले आहेत. निर्भया पथकाच्या फलकावर महिला हेल्पलाइन नंबर 10 91 व 100 क्रमांक देण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय जाधव, एल. सी. सूर्यवंशी, चिफरे, पोलीस कॉन्स्टेबल मांढरे उपस्थित होते.
विद्यार्थी व पालकांना निर्भया पथक याविषयी मार्गदर्शन करून महिला सुरक्षा, छेडछाड व तक्रार कशी करावी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच मोबाईल फोनचा वापर करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याविषयी माहिती देऊन त्याची व्हिडिओ क्लिपही दाखवण्यात आली.
पोलीस दल हे नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, उपमुख्याध्यापिका अनुराधा कदम, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे व स्निग्धता चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


