ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाहेर धरणे आंदोलन करून सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवले.
सातारा : ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाहेर धरणे आंदोलन करून सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवले.
निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारने २०२१ ची जनगणना का केली नाही?, ओबीसींची जातीनिहाय जनगणना का होत नाही?, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून कोणी केला?, ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत?, स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण गेल्यामुळे ६५ हजार प्रतिनिधी सत्तेपासून वंचित राहिले. त्यांनी हे आरक्षण ठेवण्यासाठी काय केले आरक्षण गेले त्याला हे प्रतिनिधी जबाबदार नाहीत का?, ओबीसींचा नवीन आयोग नेमून डाटा जमा करण्याचे नाटक राज्य सरकार का करीत आहे?, ओबीसींना आरक्षण शासनाच्या घटनेच्या माध्यमातून हवे आहे हे राजकीय पक्षांचे आरक्षण लिहून आम्हाला पक्षाचे गुलाम बनवायचे नाही. ओबीसींना घटनाबाह्य क्रिमिलियरची अट का लावली याचे शासनाने उत्तर द्यावे. ओबीसींचे बनावट दाखले काढून पदे भूषवणारे या प्रतिनिधींना शासन करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात भरत लोकरे, नेताजी गुरव, भाऊसाहेब दळवी, संजय पोतदार संजय परदेशी, सुरेश पवार, सुनील पवार, प्रमोद क्षीरसागर, श्रीकांत आंबेकर, विजय सपकाळ, राजेंद्र कुंभार, अनिल लोहार, चंद्रकांत सुतार, सुनिता दीक्षित, शुभांगी लोहार, बाळकृष्ण देसाई, आशा पंडित आदि सहभागी झाल्या होत्या.


