रयतचे विद्यार्थी गिरवणार केंब्रिज विद्यापीठाचे धडे
रयत शिक्षण संस्थेला केंब्रिज विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची भेट; अभ्यासक्रम व व्यावसायिक कौशल्य विकसन करारावर प्राथमिक चर्चा
रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे चार लाख साठ हजार विद्यार्थ्यांना केंब्रिज विद्यापीठाचे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. रयत शिक्षण संस्था व केंब्रिज विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी साताऱ्यात पार पडली.
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे चार लाख साठ हजार विद्यार्थ्यांना केंब्रिज विद्यापीठाचे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. रयत शिक्षण संस्था व केंब्रिज विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी साताऱ्यात पार पडली.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी व केंब्रिज विद्यापीठाचे दक्षिण आशिया विभागाचे कार्यकारी संचालक अर्जुन राजामणी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये इंग्रजी संभाषण, शिक्षकांचे अंगभूत कौशल्य विकसन, संशोधन व तंत्रज्ञान अभ्यासक्रम विकसन या चार महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे सचिव विकास देशमुख उपस्थित होते. केंब्रिज विद्यापीठाच्या वतीने आलेल्या शिष्ट मंडळामध्ये केंब्रिज विद्यापीठाचे प्रादेशिक व्यवस्थापक व्ही. व्ही. जोशुआ व इंग्रजी विभागाचे दक्षिण आशिया विभाग प्रमुख अमोल नाडकर्णी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीसंदर्भात माहिती देताना दळवी म्हणाले, केंब्रिज विद्यापीठ आणि त्याच्या शैक्षणिक परंपरेला साडेआठशे वर्षाचा इतिहास आहे. केंद्रीय विद्यापीठाच्या एकाच कॅम्पस मध्ये वेगवेगळे शिक्षण देणारे 21 कॉलेजेस आहेत. त्यांनी अंगभूत कौशल्य व्यवसाय विकसन व तंत्रज्ञान कौशल्य विकास या माध्यमातून नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाच्या संदर्भात रयत शिक्षण संस्थेत ते चालू करण्याच्या दृष्टीने केंब्रिज विद्यापीठाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेशी पत्रव्यवहार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रात 4 लाख 59 हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा बोलणे, लिहिणे, कौशल्य विकास, शिक्षक कौशल्य प्रशिक्षण विकसन वेगवेगळ्या विषयांमध्ये उत्तुंग पातळीवरचे संशोधन आणि तंत्रज्ञान कौशल्य विकास या चार मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये रयत शिक्षण संस्थेचा शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर काम करणारा अभ्यास संशोधन गट तयार करून या गटाकडून या प्रशिक्षण कार्यक्रमाचा रोड मॅप तयार केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम नक्की कोणत्या माध्यमातून, कुठल्या फॅकल्टी साठी सुरू करायचा या विषयावर अद्याप चर्चा झालेली नाही. परंतु या विषयावर लवकरच चर्चा होऊन ती क्षेत्रे निश्चित केली जातील, असे दळवी यांनी सांगितले.
या बैठकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षकांना आयसीएससी, सीबीएससी, आयबीआयजीसीएससी यांच्या व्यापक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणे, केंब्रिज विद्यापीठाचे वेगवेगळे अभ्यासक्रम भारतीय शिक्षण व्यवस्थेत सुसंगत होतील या पद्धतीने संरचित करणे, विद्यार्थी व शिक्षक यांच्या ज्ञान कक्षा विस्तारित करून त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विशेष प्रशिक्षणांचे आयोजन करणे इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असणार असून त्यासंदर्भात लवकरच एक आराखडा बनवला जाईल, असे दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.


