पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याच गटाच्या मागासवर्गीय समाजातील गमेवाडी,ता. कराडच्या सरपंच सविता ढवळे यांना विचारात न घेता सवर्ण समाजातील उपसरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत आहेत. त्याबाबत त्यांनी दि. 2 ऑक्टोबरला आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.
सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याच गटाच्या मागासवर्गीय समाजातील गमेवाडी,ता. कराडच्या सरपंच सविता ढवळे यांना विचारात न घेता सवर्ण समाजातील उपसरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत आहेत. त्याबाबत त्यांनी दि. 2 ऑक्टोबरला आत्मदहनाचा इशाराही दिला आहे. त्याच अनुषंगाने प्रत्यक्ष पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदन देवून आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, अशी कैफियत निवेदनाद्वारे करताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विधानसभा मतदार संघातील कराड तालुक्यातील गमेवाडी गावातील मागासवर्गीय प्रवर्गातून सरपंच म्हणून निवडून आलेल्या सविता ढवळे व तर ग्रामपंचायत सदस्या त्यांची आई बाळकाबाई ढवळे या आहेत. दोघीही बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. गावात एकच मागासवर्गीय कुटुंब आहे. काहींनी 75 वर्षीय असलेल्या बाळकाबाई यांना सरपंच बनवण्याचा कुटील डाव टाकला होता. प्रशासनाने सविता ढवळे यांना सरपंचपदी निवड केली. याचा राग मनात धरुन उपसरपंच वसंत जाधव आणि ग्रामसेवक प्रशांत कोरडे यांनी जाणीवपूर्वक द्वेषातून ओबीसी महिला सरपंच असल्याने त्रास देण्याचे काम सुरु केले आहे. त्यांच्या परस्पर निधीचा व्यवहार केला जात असून हा चुकीचा प्रकार सुरु असल्याने सरपंच सविता ढवळे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्याच अनुषंगाने आज पालकमंत्र्यांची भेट घेवून त्यांनी कैफियत मांडली. पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी याची चौकशी करुन कार्यवाही करते, असे आश्वासन दिले. दरम्यान, सुनावणी प्रकरणीही कार्यवाही करते, असेही त्यांनी सरपंच सविता ढवळे यांना सांगितले.
पालकमंत्र्यांनीच न्याय द्यावा
पालकमंत्र्यांच्याच गटाच्या असलेल्या सरपंच सविता ढवळे यांच्याबाबतीत त्यांच्याच गटाच्या उपसरपंचाकडून मनमानी सुरु आहे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा. तब्बल दोन वेळा सरपंचांनी कैफियत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मांडली होती. आता जर त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मागासवर्गीय महिलेला न्याय दिला नाही तर रिपब्लिकन सेनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विशाल भोसले यांनी दिला आहे.


