maharashtra

शाहूपुरी चौक अतिक्रमणांच्या विळख्यात


Shahupuri Chowk is in the grip of encroachments
सातारा शहरातील शाहूपुरी चौक परिसरात अतिक्रमणे बोकाळली असून पालिकेने या अतिक्रमणांवर कारवाईचा दंडुका उगारावा, अशी मागणी समस्त शाहूपुरीवासियांकडून होत आहे.

सातारा : सातारा शहरातील शाहूपुरी चौक परिसरात अतिक्रमणे बोकाळली असून पालिकेने या अतिक्रमणांवर कारवाईचा दंडुका उगारावा, अशी मागणी समस्त शाहूपुरीवासियांकडून होत आहे.
सातार्‍याची झालेली हद्दवाढ, त्यानुषंगाने होणारी अतिक्रमणे ही सातारा पालिकेला डोकेदुखीच ठरत आहे. मात्र, यावर उपाय शोधण्याऐवजी पालिका प्रशासन पद्धतशीरपणे या गोष्टीकडे कानाडोळा करताना दिसून येत आहे. शाहूपुरी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असून त्याचा परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होण्यास सुरुवात झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन दररोज वाद विवाद सुरु आहेत. मात्र अशा परिस्थितीत वाहतूक शाखा आणि सातारा नगरपालिकेचे प्रशासक गांधारीची भूमिका घेऊन कानाडोळा करीत आहेत. महाड ते समर्थ मंदिर बोगदा असा या रस्त्याचा ब्रिटीशकालीन इतिहास असून गेंडामाळ नाका ते सन डॉन हॉटेल 80 फूट व तिथून पुढे मेढा रोड पर्यंत 100 फूट रुंदी असणारा हा मार्ग शाहूपुरी चौक परिसरात जेमतेम 20 फुटापेक्षा कमी झाल्याचे विदारक चित्र या परिसरातील नागरिकांना याची देही, याची डोळा पहावे लागत आहे. मात्र, ढिम्म प्रशासन या अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. या परिस्थितीवर पालिका प्रशासनाने कारवाई करून शाहूपुरी चौक परिसरास मोकळा श्वास द्यावा. सध्या सातारा नागरपालिकेमध्ये प्रशासक राज्य सुरु असून निवडणुकीनंतर राजकीय हस्तक्षेप झाल्यास अतिक्रमण काढण्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे पालिका मुख्याधिकार्‍यांनी प्रशासक काळातच शाहूपुरी चौकातील अतिक्रमणांवर हातोडा मारावा, अशी मागणी शाहूपुरीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.