बाल गुन्हेगारांवर खटले चालवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील
कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती
वाढती बाल गुन्हेगारी चिंतेचा विषय असून त्यांना कायद्याचे अभय मिळत आहे. बाल गुन्हेगारांवरही खटले चालवण्यासाठी पोलीस अधिक प्रयत्नशील राहतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी येथे दिली.
सातारा : वाढती बाल गुन्हेगारी चिंतेचा विषय असून त्यांना कायद्याचे अभय मिळत आहे. बाल गुन्हेगारांवरही खटले चालवण्यासाठी पोलीस अधिक प्रयत्नशील राहतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी येथे दिली.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी ते जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना फुलारी पुढे म्हणाले, देशभरात 18 वर्षाखालील बाल गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारी कृत्यांपासून मुलांना रोखण्यासाठी पालकांनी आणि समाजाने स्वतःहून पुढे आले पाहिजे. पोलीस सुरुवातीपासून प्रयत्नशील आहेत. मात्र कायद्याचाच आधार अल्पवयीन मुलांना मिळत असल्याने पोलिसांवर कारवाई करण्याच्या मर्यादा येतात. त्यातूनही पोलीस गंभीर व क्रूर घटनांमधील गुन्ह्यांची चार्जशीट बनवून बालन्यायालयात ते चालवण्यासाठी आग्रही राहतात. सातारा जिल्हा पोलीस दलाने बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी व युवकांच्या हाताला काम देण्यासाठी उंच भरारी हा उपक्रम हाती घेतला आहे. कम्युनिटी पोलिसिंगवर भर दिला जात असून एसपी समीर शेख वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, जिल्ह्यात बालगुन्हेगारी विरोधात त्रिसूत्री कार्यक्रम राबवला जात आहे. रोजगार कौशल्य विकास, गाव पातळीवरील खेळाडूंना व्यासपीठ व युवकांमध्ये वक्तृत्व लेखन चर्चासत्र राबवली जाणार आहेत. या माध्यमातून बाल गुन्हेगारी निश्चित रोखली जाईल, असा विश्वास आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी संध्याकाळी महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढत्या बाल गुन्हेगारी बाबत चिंता व्यक्त करून कठोर निर्णय घेण्याची मागणी केल्याचे फुलारी यांनी सांगितले. यावर पोलीस दल निश्चित प्रयत्नशील असल्याचेही फुलारी यांनी स्पष्ट केले.


