maharashtra

प्रतापगंज पेठ येथे युवकावर चाकू हल्ला

बकासुर गँगच्या सदस्यांचे कृत्य; युवकाची प्रकृती गंभीर

येथील प्रतापगंज पेठेतील श्रीराम मंदिरासमोर बुधवार नाका परिसरात राहणाऱ्या आर्यन अडागळे (वय २०) या युवकावर बकासुर गँगच्या सदस्यांनी चाकू हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांमध्ये तक्रार केल्याचा राग मनात ठेवून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

सातारा : येथील प्रतापगंज पेठेतील श्रीराम मंदिरासमोर बुधवार नाका परिसरात राहणाऱ्या आर्यन अडागळे (वय २०) या युवकावर बकासुर गँगच्या सदस्यांनी चाकू हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांमध्ये तक्रार केल्याचा राग मनात ठेवून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित युवकाची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली आहेत. बकासुर गॅंग च्या सदस्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
तपासाच्या दृष्टिकोनातून शाहूपुरी पोलिसांनी यासंदर्भात अधिकृतरित्या दुजोरा दिला नाही. आर्यन अडागळे हा दुपारी पावणेचार च्या दरम्यान प्रतापगंज पेठेतून बुधवार नाका परिसराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी बकासुर यांचे चार-पाच जण दोन दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनी अडागळे याच्यावर थेट चाकूने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये अडागळे जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. भर दिवसा अचानक चाकू हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
हा प्रकार बकासुर यांच्या टोळीने केल्याचे समोर येत असून तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलीस निरीक्षक संजय पतंगे स्वतः घटनास्थळी हजर झाले. या गॅंगला पाच महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी हद्दपार केले होते. त्यावेळी सुद्धा साताऱ्यातील एका महाविद्यालयासमोर त्यांनी एका युवकाला मारहाण केली होती. पुन्हा तशाच घातक प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने पोलीस हल्लेखोरांचा असून शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू होते.