वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात महाडला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला नागेवाडी फाट्यावर सोळा नंबर बस स्टॉप जवळ आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाई : वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात महाडला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला नागेवाडी फाट्यावर सोळा नंबर बस स्टॉप जवळ आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाड येथील काही भाविक पंढरपूर-तुळजापूर दर्शनासाठी गेले होते. आज सकाळी पंढरपूरहून निघून त्यांनी मांढरदेवी दर्शन केले. खाजगी लक्झरी बसने क्रमांक (एम एच ०६ एएस ९३५४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाई मार्गे महाड ला जात असताना पसरणी घाटात या ट्रॅव्हल्स बसच्या इंजिन मधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने गाडी थांबवून पाहिले असता इंजिनला आग लागली होती. त्याने ताबडतोब सर्व ३५ प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवासी खाली उतरेपर्यंत गाडीने पेट घेतला होता. घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी ही माहिती वाई पोलीस ठाण्यात व पालिकेस कळवली. पोलीस कर्मचारी व वाई पालिकेच्या आगबंबाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


