maharashtra

कुसुंबीच्या निवृत्त पोस्टमनचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा

मिळकत पत्रकात तत्कालीन ग्रामसेवक, सरपंचांनी परस्पर बदल केल्याचा आरोप

सातारा शहरात पोस्टमनची सेवा बजावलेले रामदास श्रीपती शिर्के यांनी येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाचा इशारा दिला आहे.

सातारा : सातारा शहरात पोस्टमनची सेवा बजावलेले रामदास श्रीपती शिर्के यांनी येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाचा इशारा दिला आहे.
कुसुंबी, तालुका जावळी या त्यांच्या मूळ गावी असणाऱ्या मिळकतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने परस्पर बदल केल्याने त्यांनी त्यांची हक्काची जागा गमावल्याचा आरोप केला आहे.
शिर्के यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत सादर केली. शिर्के यांच्या म्हणण्यानुसार, सध्या ते साताऱ्यात रामाचा गोट येथे राहावयास असून त्यांनी पोस्टामध्ये तीन दशके सेवा बजावली. त्यांचे मूळ गाव कुसुंबी, तालुका जावली असून तेथे त्यांचे वडीलोपार्जित घर आहे. सर्वे क्रमांक 21 आणि सध्याचा नवीन क्रमांक सर्वे क्रमांक 21 यामध्ये त्यांचा 28 फूट लांब आणि 90 फूट रुंद असा एक भूखंड असून घराच्या पुढे आणि पाठीमागे बरीच मोकळी जागा शिल्लक असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मिळकत पत्रकामध्ये पुढे हा शब्द काढून टाकीत केवळ मागील जागा शिल्लक असल्याचे खोटे कागदपत्र तयार केले. त्यांच्या राहत्या जागेची भिंत पाडून परस्पर दुसऱ्याने तेथे भिंत बांधली. काही लोकांचे अतिक्रमण त्यांच्या जागेत झाल्याने त्यांच्या मूळ घराला धोका निर्माण झाला आहे..
या संदर्भात संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी दाद मागूनही काहीच फरक पडला नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच यांची तातडीने चौकशी करण्यात यावी आणि त्यांची वैयक्तिक मिळकत विनाजोखमीची करून देण्यात यावी, अशी शिर्के यांची मागणी आहे. अन्यथा येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.