सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दि. 20 रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दि. 20 रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व अहवाल सालात समाजाशी, सहकार चळवळीशी, बँकेशी बांधिलकी असणार्या, निधन पावलेल्या सभासद मान्यवर, कार्यकर्ते, बँक सेवक तसेच देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शूर जवान याशिवाय ज्ञात, अज्ञात मृत बँक खातेदार, बँकेचे हितचिंतक इत्यादिंना सभेने श्रध्दांजली वाहिली.
बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांनी बँकेच्या अहवाल सालातील कामाचा, प्रगतीचा, कार्याचा आलेख सभेसमोर विषद केला. यामध्ये शेतकरी सभासद, सर्वसामान्य सभासदांच्या हिताच्या दृष्टीने राबवित असलेल्या विविध कर्ज व ठेव योजना, तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून विकासाभिमुख करीत असलेले काम, कृषि व ग्रामीण विकास योजना इ. चा उल्लेख करुन संकल्पपूर्तीची, भावी संकल्पाची माहिती दिली. नुकतेच बँकेचा ’एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल’ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे शुभ हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करणेत आला. बँकेच्या या यशस्वी वाटचालीत कै. लक्ष्मणराव पाटील, कै. सदाशिवराव पोळ, कै. दादाराजे खर्डेकर, कै. विलासराव पाटील (वाठारकर ), श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा असून या दशकातील जवळपास 7 वर्षे चेअरमन पदाची धुरा सांभाळणारे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, आ. शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
ते म्हणाले, आपल्या बँकेच्या 72 व्या वार्षिक सर्व साधारण सभेस उपस्थित राहिलेबद्दल आपले मनःपूर्वक स्वागत करतो. जिल्ह्याची मातृसंस्था व अर्थवाहिनी असणार्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशस्वी वाटचालीमध्ये यशवंतराव चव्हाण, आर.डी. पाटील, बाळासाहेब देसाई आणि आबासाहेब वीर इत्यादी थोर नेत्यांचे नेतृत्व लाभलेमुळे बँकेची यशस्वी प्रगती झाली आहे. कार्यक्षम प्रशासन, उत्कृष्ट निधी व्यवस्थापन, पारदर्शक आणि भविष्यवेधी सकारात्मक धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी याव्दारे बँकेच्या उत्कर्षाचा आलेख कायम चढता ठेवला आहे. बँकेस नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. स्थापनेपासून बँकेस ऑडीट अ’ वर्ग प्राप्त झालेला आहे. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना एन .पी .ए चे निकष लागू केलेपासून निव्वळ एन .पी .ए . चे प्रमाण सलग 15 वर्षे शून्य’ टक्के राखणेत बँकेला यश प्राप्त झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी वार्षिक साधारण सभेच्या विषयांचे वाचन केले. विषयानुषंगाने सांगोपांग चर्चा होवून सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. बँकेची वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणाली, बँकेचे उत्कृष्ठ कामकाज, सक्षम व भक्कम आर्थिक स्थिती, बँकेच्या विविध व नाविन्यपूर्ण विकास योजना याबद्दल सभासदांनी बँकेच्या कामाची प्रशंसा करुन यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्था सभासदांच्या प्रतिनिधींनी बँकेच्या उल्लेखनिय कामकाजाबद्दल अभिनंदनाचे ठराव मांडले. तसेच विविध कर्ज योजना व कामकाजाचे अनुषंगाने असलेल्या अडीअडचणी संबंधी प्रश्न सभेत मांडले तसेच काही सूचना केल्या. सभासदांनी केलेल्या सुचनाबाबत विचार केला जाईल तसेच अडीअडचणी, बँकेच्या नवनवीन योजना, प्रश्न सोडवणूकीचे दृष्टीने बँकेचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहील व सहकार्य करेल अशी ग्वाही अध्यक्ष यांनी दिली. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनीही सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले.
यावेळी सभेला मार्गदर्शन करताना, बँकेचे जेष्ठ संचालक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सभासदांनी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारणेची परंपरा कायम ठेवली आहे. त्रिस्तरीय यंत्रणेत जिल्हा मध्यवर्ती बँकांनी अत्यंत गुणात्मक कामकाज केले पाहिजे. बँकेत राजकारण आणले जात नाही. बँक, विकास संस्था/कारखाने यांनी आपल्या कार्यपध्दतीमध्ये बदल करुन गुणात्मक व दर्जात्मक काम करणे आवश्यक आहे.
बँकेचे संचालक व माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील, बाळासाहेब देसाई, किसन वीर इत्यादि थोर नेत्यांनी या बँकेची स्थापना केली व त्यांच्या पुरोगामी विचार व योगदानातून या बँकेची जडणघडण झाली आहे. त्यामुळे बँकेचा राज्यातच नव्हेतर देशभरात नावलौकिक झालेला असलेचे आपणास विदीत आहेच. या थोर नेत्यांचे पाठबळ सुरुवातीपासून बँकेला लाभले असलेमुळे बँकेला चांगली आर्थिक शिस्त लाभली आहे. या दिग्गज नेत्यांचे थोर विचारातून कृषी क्रांतीचा पाया रचला गेला व शेतकर्यांमध्ये आर्थिक परिवर्तन झाले. बँक सर्वसामान्य शेतकरी सभासद / ग्राहक यांचे हित डोळयासमोर ठेवून कामकाज करीत आहे. शेतकरी सभासदांबरोबरच जिल्हयातील सहकारी साखर कारखानदारीचे वाढीलाही बँक चालना देत आहे हे विशेष आहे. बँकेने जिल्हयातील शेतकरी सभासद, ग्राहक, कर्जदार, उद्योजक व व्यवसाईक इत्यादिंसाठी विविध प्रकारच्या ठेव व कर्ज योजना तसेच आधुनिक बँकिंगच्या सेवा सुविधा सुरु केलेल्या असून त्याचा चांगला लाभ होत आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी साखर कारखान्यांनी इथेनाल उत्पादनास प्राधान्य द्यावे असे सूचित केलेमुळे अलिकडे सर्वच साखर कारखाने इथेनाल उत्पादनाला प्राधान्य देत आहेत. बँकांचा साखर कारखान्यांना होणारा कर्ज पुरवठा कमी होत असलेने कर्जाचे इतर मार्ग शोधणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रापुढे मोठी आव्हाने असून ग्राहकांना तत्पर व जलद सेवा सुविधा तसेच काटकसरीने बँक चालविणे क्रमप्राप्त होणार आहे. केंद्र शासन सर्व विकास संस्थांना एकाच प्रकारचे साफ्टवेअर/हार्डवेअर पुरविणार असून सर्व विकास संस्था संगणकाच्या माध्यमातून जिल्हा बँकांना जोडल्या जातील. आधुनिक युगामध्ये 7/12 डिजीटल होत असताना आपण ग्राहकांना जास्तीत जास्त डिजिटल बँकिंग सेवा दिल्या पाहिजेत. महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेचा नियमित कर्ज परतफेड करणार्या सभासदांनाही रु. 50000/- चा लाभ मिळणार आहे. पूरग्रस्त शेतकरी सभासदांनाही लाभ देणेचा प्रयत्न केला आहे. बँकेचे एकूण कामकाज उत्तम आहे. कोविड 19 चा प्रादुर्भावानंतर होणार्या सभेला मोठया संख्येने सभासद उपस्थित आहेत ही चांगली बाब आहे. विकास संस्थांचे संचालक सदस्यांसाठी प्रशिक्षण घ्यावे असे काही सभासदांनी प्रश्न उपस्थित केला असून त्यासाठी बँकेची कार्यवाही सुरू आहे. बँकेच्या एकूण गुणात्मक कामकाजामध्ये बँकेचे संचालक सदस्य, बँकेचे अधिकारी/सेवक यांचे मोठे योगदान असून भविष्यामध्ये आपणाकडून बँकेचे कामकाज चांगले होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हयातील 954 विकास सेवा संस्थांपैकी 913 विकास संस्था नफ्यात असून या विकास सेवा संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन व्हावे, त्यांना योग्य न्याय मिळावा व इतर संस्थांनी या संस्थांचा आदर्श घ्यावा याकरीता संस्थांची कार्यक्षमता अजमावून उत्कृष्ठ कामकाज करणार्या विकास संस्थांना विशेष पुरस्कार देणेत आले. यामध्ये जिल्हास्तरावर रेठरे बुा विकास सेवा संस्था लि., रेठरे बुा यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रुपये 50000/- आणि तालुकास्तरावर सातारा-भैरवदेव विकास सेवा संस्था लि., करंजे, पाटण- मोरगिरी ग्रुप विकास सेवा संस्था लि, वाई-अनवडी विकास सेवा संस्था लि., जावली- सरताळे विकास सेवा संस्था लि., महाबळेश्वर- पाचगणी विकास सेवा संस्था लि., कोरेगांव-नहरवाडी विकास सेवा संस्था लि., खंडाळा- भादवडे विकास सेवा संस्था लि., फलटण- राजाळे विकास सेवा संस्था लि., खटाव- म्हासुर्णे विकास सेवा संस्था लि., माण- महिमानगड विकास सेवा संस्था लि. यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रुपये 25000/- देवून गौरविणेत आले.
सभेस बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, प्रदिप विधाते, शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर, सत्यजित पाटणकर, सुनील खत्री, शेखर गोरे, रामराव लेंभे, ज्ञानदेव रांजणे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, वैधानिक लेखापरीक्षक स्वानंद देव, कर सल्लागार तानाजीराव जाधव, तसेच वि. का. स. सेवा सोसायटया, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, अर्बन बँका, सहकारी पतसंस्था व ग्राहक संस्था, मजूर सोसायटया, पाणीपुरवठा संस्था इत्यादि सहकारी संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी, व्यक्ती सभासद उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी सभेस उपस्थित मान्यवर व सभासद प्रतिनिधींचे आभार मानले.


