यंदा कोरोनाचे संकट मावळल्याने गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी एसटीला गर्दी केली होती. या परिवहन विभागानेही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसचे योग्यरीत्या संचलन केले होते. त्यामुळे सातारा एसटी विभागाच्या तिजोरीत यंदा गणेशोत्सवाच्या काळात ११ कोटी २९ लाख ८० हजारांची भर पडली.
सातारा : कोरोनाचे संकट, कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एसटीला आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. मात्र, यंदा कोरोनाचे संकट मावळल्याने गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी एसटीला गर्दी केली होती. या परिवहन विभागानेही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसचे योग्यरीत्या संचलन केले होते. त्यामुळे सातारा एसटी विभागाच्या तिजोरीत यंदा गणेशोत्सवाच्या काळात ११ कोटी २९ लाख ८० हजारांची भर पडली.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात आले होते. या काळात एसटीचे संचलन ठप्प झाल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर २०२१ च्या मार्च - एप्रिलमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यानंतर किमान सात ते आठ महिन्यांनी संपातील कर्मचारी कामावर हजर झाले. या घटनांनंतर यंदा गणेशोत्सवात एसटी विभागाला उत्पन्न मिळविण्याची पहिली चांगली संधी होती. कोरोनाचे संकटही कमी झाल्याने यंदाचा गणेशोत्सव धामधुमीत साजरा करण्यासाठी परगावचे चाकरमानी गावी मोठ्या संख्येने आले होते.
प्रवाशांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीवर दाखवलेल्या विश्वास व प्रेमामुळे गणेशोत्सवाच्या काळात चांगले उत्पन्न मिळाले. एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने गणेशोत्सवाच्या काळात लांब पल्ल्यांच्या व जिल्ह्यांतर्गत बसच्या संचलनाचे नियोजन योग्य पद्धतीने केले होते.
- रोहन पलंगे, सातारा विभाग नियंत्रक (एसटी)


