कराडात 'झिरो वेस्ट' संकल्पनेतून वाढदिवस साजरा
स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील उपक्रम : नगरपालिकेच्या संकल्पनेस नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद
येथील नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानाचा भाग असलेल्या "झिरो वेस्ट" या उपक्रमांतर्गत नुकताच एक वाढदिवस साजरा करण्यात आला. प्लास्टिक वस्तू, कागद, प्लेट तसेच अन्य वेस्ट न होणाऱ्या वस्तूंना बगल देत हा वाढदिवस साजरा झाला. शहरातील मारुती काटरे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या छोटेखानी वाढदिवस कार्यक्रमात ‘झिरो वेस्ट’ संकल्पना राबवत जनजागृती करण्यात आली.
कराड : येथील नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानाचा भाग असलेल्या "झिरो वेस्ट" या उपक्रमांतर्गत नुकताच एक वाढदिवस साजरा करण्यात आला. प्लास्टिक वस्तू, कागद, प्लेट तसेच अन्य वेस्ट न होणाऱ्या वस्तूंना बगल देत हा वाढदिवस साजरा झाला. शहरातील मारुती काटरे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या छोटेखानी वाढदिवस कार्यक्रमात ‘झिरो वेस्ट’ संकल्पना राबवत जनजागृती करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर.डी. भालदार, आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे, माजी नगरसेवक व आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, स्वच्छ सर्वेक्षण टिमचे सदस्य आणि मारुती काटरे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत कराड नगरपालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेअंतर्गत प्लास्टिक कचरा, त्याचे संकलन व विघटन, घर कचर्याचे कंपोस्टिंग व त्या अनुषंगाने जनजागृती करण्यावर नगरपालिकेकडून भर देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनाही या विषयाची आवड निर्माण झाली असून अनेकजण पालिकेच्या संकल्पनेचे अवलोकन करीत आहेत. तसेच नागरिक आता कागदी, कापडी पिशव्या, वापरू लागले आहेत.
सध्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 चे पर्व सूरू झाले असून 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम सूरू झाले आहेत. या अभियानात 'झिरो वेस्ट' या संकल्पनेनुसार मारुती काटरे यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या वाढदिवस कार्यक्रम साजरा केला. हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. यामध्ये रंगीत, बेगडी कागद, प्लास्टिक पॅकिंग, प्लास्टिक चमचे व प्लेट, तसेच अन्य साहित्याचा वापर टाळून वाढदिवसाचा केकस्टिलच्या भांड्यात ठेवूत स्टिलचेच चमचे आणि प्लेट वापरण्यात आल्या. तसेच कार्यक्रमात शिल्लक वेस्टचा वापर कंपोस्टिंगसाठी देण्यात आला.
नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध बाबी प्रत्यक्षात आमलात आणल्यानेच पालिका देशात अव्वल ठरत आहे. स्वच्छता, पर्यावरण, प्रदूषण आदी. बाबींचे पालनही होत आहे. नागरिकांनी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेचा वापर केल्यास विघातक वस्तूपासून अनेक गोष्टींचा धोका टळणार आहे. तसेच अनावश्यक खर्च टाळत निसर्गाचा समतोल राखला जाणार असल्याने आपल्या जीवनशैली, आरोग्यासाठीही याचा फायदा होणार आहे.
- मुख्याधिकारी रमाकांत डाके (कराड नगरपालिका)
माझ्या मित्रांनी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेनुसार वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले. यामध्ये कसल्याही प्रकारच्या प्लास्टिक व कागदी वस्तूंचा वापर करण्यात आला नाही. अल्पोहारासाठी स्टीलच्या भांड्यांचाच वापर केल्याने पर्यावरण रक्षणासह खर्चातही बचत झाली. त्यामुळे सर्व नागरिकांनी ‘झिरो वेस्ट’ संकल्पना अमलात आणावी.
- मारुती काटरे


