maharashtra

माझ्या मतदारसंघात मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव

गोडोली येथील विकास कार्यक्रम प्रसंगी खासदार उदयनराजे यांचा आरोप

Intrigue to cancel the right to vote in my constituency
जिल्हा बँकेत काहीजण मतदारांचा मतांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतदारसंघातही असाच मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव काहींनी रचला होता. पण आम्ही वकील देऊन पुन्हा त्या मतदार सभासदांना मतांचा अधिकार कायम ठेवला, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

सातारा : जिल्हा बँकेत काहीजण मतदारांचा मतांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतदारसंघातही असाच मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव काहींनी रचला होता. पण आम्ही वकील देऊन पुन्हा त्या मतदार सभासदांना मतांचा अधिकार कायम ठेवला, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीवरून मतदार सभासदांची बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घेतले असते तर जास्त संयुक्तिक झाले असते, असा खोचक टोलाही त्यांनी लागावला.
गोडोली येथील कार्यक्रमानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. उदयनराजे म्हणाले, जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांना कर्ज मिळावे, त्यातून त्यांची प्रगती कशी होईल, यासाठी जे कोणी निवडून जाणार आहेत, त्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे. काही वेळेस नको ती लोक आपण निवडून देतो आणि बँक किंवा संबंधित संस्थेचे खासगीकरण झालेले पाहायला मिळते. सहकारी संस्था मोडीस काढल्या जातात. आपले नशीब चांगले आहे, की सातारा जिल्हा बँकेचे कामकाज उत्कृष्ट प्रकारचे आहे.
अलिकडे बँकेत मतांचे राजकारण सुरू आहे. गृहनिर्माण असेल दुग्ध विकास, पाणीपुरवठा मतदारसंघ असेल, येथील मतदारांचा मतांचा अधिकार रद्द कसा होईल यासाठी काहीजण प्रयत्न करतात. मुळात सभासदांनी मतदान कोणाला कारायचे हा त्यांचा अधिकार आहे. पण मलाच करा, यालाच करा, असे बंधन केले जाते. बँक एका उंचीवर राहावी, बँकेला गालबोट लागू नये, याचा विचार झाला पाहिजे. मतदारांनी मतदान करू नये यासाठी काहीजण प्रयत्न करतात. माझ्या मतदारसंघातही असाच प्रयत्न झाला होता. पण, आम्ही वकिल देऊन त्या मतदारांच अधिकार कायम ठेवला. त्यामुळे सभासदांनी संचालकांना निवडून देताना संबंधित संचालकांमुळे किती संस्था मोडकळीस निघाल्या हे लक्षात घ्यावे. मगच त्यांना निवडून द्यायचे की नाही, हे ठरवावे.