स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब सोमण यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे : भाई ज्ञानेश्वर वांगडे
लोकप्रिय भाऊसाहेब सोमण चरित्र ग्रंथाच्या द्वितीय आवृत्ती चे प्रकाशन संपन्न
स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ नेते असलेले भाऊसाहेब सोमण म्हणजे सामाजिक व राजकीय कार्यातील दीपस्तंभ म्हणावे लागेल असे व्यक्तिमत्व होते, असे गौरवोद्गार ज्ञानश्री इन्स्टिट्यूट चे संस्थापक व सहकार चळवळीतील एक अग्रणी भाई ज्ञानेश्वर वांगडे यांनी सातारा येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले.
सातारा : स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ नेते असलेले भाऊसाहेब सोमण म्हणजे सामाजिक व राजकीय कार्यातील दीपस्तंभ म्हणावे लागेल असे व्यक्तिमत्व होते, असे गौरवोद्गार ज्ञानश्री इन्स्टिट्यूट चे संस्थापक व सहकार चळवळीतील एक अग्रणी भाई ज्ञानेश्वर वांगडे यांनी सातारा येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले.
स्वातंत्र्यसैनिक स्मृतीशेष रामचंद्र गणेश उर्फ भाऊसाहेब सोमण यांच्या स्मृत्यर्थ उभ्या राहिलेल्या भाऊसाहेब सोमण स्मारक समिती, सातारा यांच्या वतीने भाऊसाहेब सोमण यांच्या कार्याचा माहिती असलेला समाजभूषण पद्मश्री पुरुषोत्तम पांडुरंग उर्फ बाबुरावजी गोखले यांनी लिहिलेला लोकप्रिय भाऊसाहेब सोमण हा चरित्र ग्रंथ १९५६ सालातील फेब्रुवारी महिन्यात भाऊसाहेब सोमण स्मारक समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला होता. या ग्रंथाची प्रथम आवृत्ती संपल्याने समितीच्या वतीने नवीन पिढीला भाऊसाहेब सोमण यांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने या सोमण स्मारक समिती मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अरुण गोडबोले यांच्या पुढाकारातून नुकतीच द्वितीय आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. या चरित्र ग्रंथाचे द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन एका अनौपचारिक कार्यक्रमात सहकार चळवळीतील नेते भाई ज्ञानेश्वर वांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत वांगडे हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी भाई ज्ञानेश्वर वांगडे बोलत होते.
भाऊसाहेब सोमण यांचे स्वातंत्र्य चळवळीतील व स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील तसेच कायदा क्षेत्रातील कामाचा गौरव करणे गरजेचे आहे व त्याची माहिती नव्या पिढीला करून देण्याचे काम भाऊसाहेब सोमण स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हे अतिशय महत्त्वपूर्ण असे काम असल्याचे ज्ञानेश्वर वांगडे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भाऊसाहेब सोमण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले यांनी सांगितले की, या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून त्यावेळच्या सातारा जिल्ह्याच्या ५०-५५ वर्षाचा राजकीय व सामाजिक इतिहास नव्या पिढीला व अभ्यासकांना अभ्यासता येणार आहे. म्हणूनच या ट्रस्टच्या वतीने ही नवीन आवृत्ती करण्याचे काम करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शंभर सार्वजनिक ग्रंथालयांना हा ग्रंथ भेट म्हणून देण्याचे ठरवल्याचे अरुण गोडबोले यांनी सांगितले. या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनासाठी भाऊसाहेब सोमण यांचे पणतू आणि कृषी टेक आणि निसर्ग हेल्थकेअर या नामांकित आयुर्वेदिक औषधे उत्पादन कंपनीचे चेअरमन गिरीश सुधाकर सोमण व भाऊसाहेबांचे खापरपणतू व या कंपन्यांचे संचालक देवेंद्र आणि तन्मय सोमण यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. प्रकाशन कार्यक्रमास विश्वस्त डॉ अच्युत गोडबोले व प्रविण जोशी उपस्थित होते.


