तुमची जैवविविधता टिकवा, परंतू स्थानिकांनाही न्याय द्या!
महाबळेश्वर प्रकरणी जिल्हा प्रशासनाविरोधात खा. उदयनराजेंची खमकी भूमिका
महाबळेश्वर सह पाचगणीची जैवविविधता तसेच निसर्ग सौंदर्य टिकलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. परंतु त्याचबरोबर स्थानिक भूमीपुत्रांवरही अन्याय होता कामा नये, अशी भूमिका घेत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज संध्याकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेतली.
सातारा : महाबळेश्वर सह पाचगणीची जैवविविधता तसेच निसर्ग सौंदर्य टिकलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. परंतु त्याचबरोबर स्थानिक भूमीपुत्रांवरही अन्याय होता कामा नये, अशी भूमिका घेत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज संध्याकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजे यांच्यासह वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील ही उपस्थित होते.
महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणार्या महाबळेश्वर व पाचगणी येथील अवैद्य बांधकामांवर जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात हातोडा उगारला होता. विशेषत: महाबळेश्वर येथील वेण्णा लेक जवळील वेण्णा नदीपात्रातील अनेक बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. यामुळे महाबळेश्वर शहरामध्ये खळबळ उडाली होती. यापूर्वीच्या अनेक जिल्हाधिकार्यांनी महाबळेश्वर व वेण्णा नदी लगतच्या अवैध बांधकामांसंदर्भात नोटीसी काढून फार्स केला होता. परंतु त्या बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोडी करून प्रकरणे मिटवण्यात आली होती. परंतु जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नोटीसींचा फार्स न अवलंबता थेट अवैध बांधकामांवरच हातोडा चालवला. यामध्ये अनेक अवैध बांधकामे जमीनदोस्त झाली. परंतु योगायोगाने जिल्ह्याच्या दौर्यावर असणारे राज्याचे मुख्यमंत्री तथा महाबळेश्वरचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर येथील स्थानिक लोकांनी भेट घेऊन आपली कैफियत सांगितली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ बांधकामांवर होत असलेली कारवाई थांबवण्याचे जिल्हाधिकार्यांना आदेश दिले. त्यामुळे संबंधितांच्या जिवात जीव आला. यानंतर यामध्ये स्थानिक आ. मकरंद पाटील तसेच राज्यसभेचे खा. उदयनराजे भोसले यांनी उडी घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले होते.
शेवटी आज दि. 9 नोव्हे. रोजी संध्याकाळी खा. उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेऊन महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरातील अवैध बांधकाम प्रकरणातील लोकांची कैफियत सांगितली. परंतु जिल्हाधिकारी डूडी यांनीही महाबळेश्वर परिसरातील वेण्णा नदीच्या पात्रात होत असलेल्या अवैध बांधकामामुळे निसर्गाचा र्हास होत असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच भविष्यामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, याचीही जाणीव करुन दिली. महाबळेश्वर हे इको-सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असल्याने या परिसरामध्ये बांधकाम करण्यावर मर्यादा आहेत. परंतु असे असतानाही काही लोक वेण्णा लेक आणि नदीपात्रामध्ये अवैध बांधकाम करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यामुळेच आम्ही कारवाई केल्याचे खा. उदयनराजे तसेच आ. मकरंद पाटील यांना डूडी यांनी सांगितले.
यावेळी खा. उदयनराजेंनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, अवैध बांधकाम तोडताना स्थानिक लोकांचाही विचार करणे गरजेचे आहे. महाबळेश्वर परिसरातील अनेक लोक उदरनिर्वाहासाठी दुसर्या मोठ्या शहरात स्थलांतरित झाले आहेत. असे असताना जर कोणी स्वतःच्या जागेत व्यवसाय करीत असेल तर ते गैर नाही. परंतु वेण्णा नदीपात्रात बांधकाम करीत असताना आपण निसर्गाशी छेडछाड तर करीत नाही ना? तसेच भविष्यामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर त्यामध्ये जीवित वा वित्तहानी होणार तर नाही ? याचा विचारही स्थानिकांनी करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
या बैठकीला खासदार उदयनराजे, आमदार मकरंद पाटील, रॉबर्ट मोजेस, प्रीतम कळसकर, निलेश बावळेकर, शंकर ढेबे यांच्यासह महाबळेश्वर, पाचगणीतील स्थानिक उपस्थित होते.


