गुप्तधनाच्या हव्यासापोटी आजीनेच दिला नातीचा नरबळी
स्थानिक गुन्हे शाखा आणि पाटण विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची दिमाखदार कारवाई; 4 वर्षांनी झाला खुनाचा उलगडा
गुप्तधनाच्या हव्यासापोटी चार वर्षांपूर्वी पाटण तालुक्यात एका मुलीचा खून झाल्याची थरकाप उडविणारी घडना घडली होती. या खुनाचा उलगडा करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी या मुलीच्या आजीसहीत चारजणांना अटक करण्यात आली आहे.
सातारा : गुप्तधनाच्या हव्यासापोटी चार वर्षांपूर्वी पाटण तालुक्यात एका मुलीचा खून झाल्याची थरकाप उडविणारी घडना घडली होती. या खुनाचा उलगडा करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी या मुलीच्या आजीसहीत चारजणांना अटक करण्यात आली आहे.
मुलीची आजी रंजना लक्ष्मण साळुंखे (रा. तळमावले, ता. पाटण), मांत्रिक कमल आनंदा महापुरे (रा. खळे, ता. पाटण), फुलसिंग सेवू राठोड (रा. ऐनापुर तांडा, ता.जि. विजापूर, कर्नाटक) आणि विकास उर्फ विक्रम तोळाराम राठोड (रा. नर्हेगाव, ता. हवेली, जिल्हा पुणे, मूळ रा. मुळेतांडा, ता. दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर) अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनाक 22 जानेवारी 2019 रोजी 7 ते 16:45 वा. च्या दरम्यान करपेवाडी, तालुका पाटण गावच्या हद्दीत देसाई शेत नावाच्या शिवारातील उसाच्या शेतात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने भाग्यश्री संतोष माने वय 17 वर्षे हिचा गळा कापून खून केला आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथमदर्शनी गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळावरील तसेच परिस्थितीजन्य पुराव्यावरून हा खून नरबळीच्या प्रकारातून झाला असल्याचा पोलिसांचा कयास होता. याबाबत पोलिसांची संशयाची सुई मृत भाग्यश्री माने हिच्या आई-वडिलांभोवती फिरत होती. या प्रकरणात तिच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरचा प्रकार हा नर बळीचा असल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार दिल्या होत्या. त्याप्रमाणे हा अतीशय क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण व ढेबेवाडी पोलीस ठाण्याकडील पथके कार्यरत होती. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार हे गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण करीत होते. त्यांना तांत्रिक विश्लेषण करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक मदत करीत होते. या तपास पथकास दोन संशयित इसम गुन्ह्याच्या घटनेच्या वेळी त्या परिसरामध्ये असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे तपास पथकाने त्यांना लक्ष करून त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष पुरविण्यास सुरुवात केली. या संबंधित व्यक्तीच्या हालचाली पडताळत असताना तपास पथकास संबंधित इसम हे एका मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचे तसेच तो मांत्रिक गुन्ह्याच्या घटनेच्या वेळी घटनास्थळाच्या परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्या दृष्टीने या दोन इसमांच्याकडे तपास पथकाने सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी गुप्तधनाच्या अमिषा पोटी मांत्रिकाच्या सांगण्यावरून मयत मुलीची आजी, दोन संशयित इसमापैकी एक इसम व आणखी एक स्त्री (देवऋषी) यांनी कट रचून संगनमताने मुलीस गुंगीचे औषध देऊन तिला उसाचे शेतात नेऊन तिचा गळा चिरून तिचा बळी दिला असल्याचे सांगितले. गुप्तधनाच्या आमिषातून स्वतःच्या नातीचा तीन वर्षांपूर्वी गळा चिरून केलेल्या खुनाचा नरबळीचा गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण, स्थानिक गुन्हे शाखा सातारा व ढेबेवाडी पोलीस ठाण्याकडील तपास पथकांनी उघड करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर या खुनाचा गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग यांच्याकडे तपासावर प्रलंबित होता व उघडकीस आला नव्हता. हा गुन्हा तीन वर्षापासून उघडकीस न आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी गुन्ह्याचे अवलोकन करून गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने विशेष प्रयत्न करून परिश्रम घेऊन पुण्यातील संशयित आरोपींबाबत तसेच त्यांच्या हालचाली बाबत माहिती प्राप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला असल्याने त्यांचे व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण येथील पोलीस अंमलदार हनुमंतराव पाटील, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत पाटील, माणिक पाटील, संग्राम बाबर यांचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी विशेष अभिनंदन केलेले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या सूचनांप्रमाणे पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार साबीर मुल्ला, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, संकेत निकम, दिपाली यादव, शकुंतला सणस, यशोमती काकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण येथील पोलीस अंमलदार हनुमंतराव पाटील, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत पाटील, माणिक पाटील, संग्राम बाबर यांनी केलेली असून कारवाई सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी अभिनंदन केलेले आहे.


