पुस्तकांच्या जत्रेत रमले सातारकर
ग्रंथ महोत्सवात नाव असलेल्या प्रकाशनांची उपस्थिती; धमाल विज्ञानाची ला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
येथील जिल्हा परिषद मैदानावर शंकर सारडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथ महोत्सवात महाराष्ट्रातील मान्यवर प्रकाशकांनी आपले पुस्तकांचे स्टॉल लावले आहेत.
सातारा : येथील जिल्हा परिषद मैदानावर शंकर सारडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथ महोत्सवात महाराष्ट्रातील मान्यवर प्रकाशकांनी आपले पुस्तकांचे स्टॉल लावले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून सातारकर पुस्तकांच्या जत्रेत रमत असून वाचक मोठ्या प्रमाणावर पुस्तके वाचत असल्यामुळे पुस्तक विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शनिवारी ग्रंथ महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात धमाल विज्ञानाची या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवात संस्कृती, नवनीत, राजहंस, साकेत, अमित यासह अनेक प्रकाशनाने पुस्तकांचे स्टॉल लावले आहेत. तब्बल दोन वर्षाच्या कालावधीनंतर सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर पुस्तकांची जत्रा भरल्यामुळे तरुण-तरुणींसह वाचक मोठ्या प्रमाणावर पुस्तक खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. आज दुपारनंतर पुस्तक खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागल्यामुळे प्रकाशकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येत होते. कथा, वाडमय, चरित्र, ऐतिहासिक, सामाजिक, आत्मचरित्र या पुस्तकांसह बालगोपाळांसाठी गोष्टीची, तरुणाईसाठी कवितांची पुस्तके मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
दरम्यान, शनिवारी सकाळी कराड येथील डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्राचे संस्थापक संजय पुजारी यांनी आयोजित केलेल्या धमाल विज्ञानाची या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी चांगलाच आस्वाद घेतला. संजय पुजारी यांनी विज्ञान काय करू शकते याची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी (शंकर सारडा : व्यक्ती आणि स्मृती) या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत विनय हर्डीकर यांच्या हस्ते, माजी शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, बाल साहित्यिका डॉ. निर्मला सारडा, ज्येष्ठ समीक्षक अनंत देशमुख आणि ग्रंथ समितीचे कार्यवाह श्री चिटणीस यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात मान्यवर कवींनी कविता सादर करून सातारकरांची मने जिंकली.
आरोग्य स्पंदनचा प्रथमच स्टॉल
आरोग्य विषयाला वाहिलेले आरोग्य स्पंदन हे मासिक गेल्या १४ वर्षापासून मुंबई येथून प्रकाशित होत आहे. या मासिकात केवळ मैत्रीपूर्ण आरोग्य विषयक सल्ला दिला जातो. महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गुणवत्तापूर्वक लेखांची मेजवानी त्यामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत ग्रंथ महोत्सवामध्ये विविध स्टॉलमध्ये आरोग्य विषयक माहिती देणारी पुस्तके पाहायला मिळत होती. मात्र केवळ आरोग्यविषयक सल्ला देणाऱ्या आरोग्य स्पंदन या मासिकाचा लावण्यात आलेला स्वतंत्र स्टॉल हा नागरिकांच्या चर्चेचा विषय झाला आहे.


