लक्ष्मण बाबुराव माने (वय ६०) हे आपल्या शेताची राखण करत असताना त्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार झाले. प्रचलित शासन नियमाप्रमाणे लक्ष्मण बाबुराव माने यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांच्या हस्ते देण्यात आला.
सातारा : दि 23 मार्च 2022 रोजी पिसाडी, कारगाव ता. जावली येथील शेतकरी लक्ष्मण बाबुराव माने (वय ६०) हे आपल्या शेताची राखण करत असताना त्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार झाले. प्रचलित शासन नियमाप्रमाणे लक्ष्मण बाबुराव माने यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांच्या हस्ते देण्यात आला.
पिसाडी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात स्थित असून अत्यंत दुर्गम भागात आहे. माने यांच्यावर गव्याचा हल्ला झाल्यानंतर कारगावचे वनरक्षक जयंत निकम यांनी त्वरित माने यांना जिल्हा रुग्णालय सातारा येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान देखील वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार आढावा घेतला गेला व या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता कार्यवाही करण्यात आली.
वनसंरक्षक नानासाहेब लडकत, उपवनसंरक्षक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस, वनरक्षक जयंत निकम, ग्रामसेवक एस.पी. लोखंडे, कारगावचे वनसमिती अध्यक्ष संदीप सावंत व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा धनादेश लक्ष्मण बाबुराव माने यांना सुपूर्द करण्यात आला.


