जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सातारा पालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर
फलटण तालुक्याला लॉटरी; सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित
सातारा जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. आरक्षणाच्या चिठ्या निघतील तसे इच्छुकांचे चेहरे खुलत होते.
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. आरक्षणाच्या चिठ्या निघतील तसे इच्छुकांचे चेहरे खुलत होते. काही विद्यमान सदस्यांच्या गटातील आरक्षण बदलल्याने त्यांच्या दांड्या गुल झाल्या असून आरक्षण सोडतीमुळे कही-खुशी, कही गम असे वातावरण पहायला मिळाले.
सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. फलटण तालुक्याला लॉटरी लागली असून सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत. दरम्यान, अकरा पंचायत समित्यांसाठीचे आरक्षण त्या त्या पंचायत समिती कार्यालयात काढण्यात आले.
जिल्हा परिषद आरक्षण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे : 1) कराड तालुका - अनुसुचित जाती - कोपर्डे हवेली (महिला), येळगाव (महिला), तांबवे. नागरिकांचा मागास प्रवर्ग- उंब्रज, चरेगांव (महिला), विंग (महिला), सैदापूर, वडगाव हवेली (महिला), रेठरे बु, सर्वसाधारण प्रवर्ग- पाल (महिला), मसूर, वारूंजी (महिला), कार्वे (महिला), काले (महिला). 2) सातारा तालुका- अनुसुचित जाती- कोडोली, नागरिकांचा मागास प्रवर्ग- खेड (महिला), कोंडवे, कारी (महिला), पाडळी, सर्वसाधारण प्रवर्ग- लिंब (महिला), पाटखळ (महिला), देगांव (महिला), नागठाणे (महिला), अपशिंगे. 3) फलटण तालुका सर्व सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण - कोळकी (महिला), वाठार निं (महिला), तरडगाव, साखरवाडी (पिंपळवाडी), सांगवी, विडणी, गुणवरे, बरड, हिंगणगाव.
4) खंडाळा तालुका- नागरिकांचा मागास प्रवर्ग- भादे (महिला), खेड बु., सर्वसाधारण प्रवर्ग - शिरवळ (महिला). 5) कोरेगाव तालुका- अनुसुचित जाती- सातारारोड, नागरिकांचा मागास प्रवर्ग- पिंपोडे बु सर्वसाधारण प्रवर्ग- वाठार स्टेशन (महिला), कुमठे, एकंबे, वाठार किरोली (महिला). 6) वाई तालुका- अनुसुचित जाती- केंजळ, बावधन, नागरिकांचा मागास प्रवर्ग- ओझर्डे, सर्वसाधारण प्रवर्ग- पसरणी, भुईंज. 7) महाबळेश्वर तालुका- सर्वसाधारण प्रवर्ग- तळदेव (महिला), भिलार (महिला). 8) जावली तालुका- नागरिकांचा मागास प्रवर्ग- कुडाळ, कुसुंबी (महिला), सर्वसाधारण प्रवर्ग- म्हसवे (महिला),
ओबीसी आरक्षणामुळे शाहूकला मंदिरामध्ये दिग्गजांच्या भवितव्याला बसला ब्रेक
सातारा पालिकेच्या इतर मागास प्रवर्ग आरक्षण सोडत प्रक्रियेत गुरुवारी अठरा प्रभागांमधून तेरा ओबीसी जागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडती मुळे काही प्रभागात माजी नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या असून काहींना पुढील काळात थांबून वेगळे पर्याय द्यावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. ओबीसी महिला आरक्षणाचे सातार्याच्या राजकारणावर पडसाद उमटणार असून राजकीय आखाड्यातील आघाड्यांना सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे.
येथील शाहू कलामंदिर मध्ये सातारा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रांत मीनाज मुल्ला, सातारा पालिकेचे प्रशासक अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले,निवडणूक निरीक्षक मोहन प्रभुणे, पालिकेच्या निवडणूक शाखेचे विश्वास गोसावी, एकनाथ गवारी, सभा अधीक्षक अतुल दिसले हेमंत अष्टेकर इत्यादी कर्मचार्यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता महिला ओबीसी प्रवर्गाची सोडत काढण्यात आली.
सर्वप्रथम प्रशासन अभिजित बापट यांनी मागास प्रवर्गाच्या सात प्रभागांची ची सोडत झाली. त्याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये 1,2,3,4,8 13,15 हे प्रभाग अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. त्यानंतर तेरा महिला ओबीसी जागांसाठी प्रभागाच्या 18 प्रभागाच्या चिठ्ठ्या सोडतीच्या ड्रममध्ये टाकण्यात आल्या. ही प्रक्रिया पारदर्शी होते की नाही, हे पाहण्याकरिता सातारा विकास आघाडीच्या वतीने बाळासाहेब ढेकणे व नगर विकास आघाडीच्या वतीने शेखर मोरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
शाळा क्रमांक सातचे विद्यार्थी साक्षी पिंपळे, अरमान पालकर, अमायका शेख, खुशबू साहू, ऋषिकेश पवार यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 8 ,9 ,10 ,11, 12, 14, 16, 17, 18 ,19, 20, 21, 22, 23, 24, 25 या अठरा प्रभागातून निर्देशाप्रमाणे तेरा ओबीसी जागा निश्चित करण्यात आल्या. या ओबीसी आरक्षण सोडतीमध्ये 21, 18, 10, 16, 11, 22, 5 या सात जागा महिला इतर मागास प्रवर्गासाठी निश्चित झाल्या तर 12, 25, 19, 24, 20 आणि 6 या सहा जागा इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी निश्चित करण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 7, 23, 9, 17, 14 हे पाच प्रभाग खुल्या गटासाठी निश्चित झाले आहेत. प्रशासक अभिजित बापट यांनी या संपूर्ण आरक्षण प्रक्रियेची उपस्थितांना माहिती दिली.
अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग क्रमांक एक मध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले आहे व एक अ ही जागा अनुसूचित जमाती साठी आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली आहे. एकूण सदस्य संख्या 50 असल्याने सदस्यांच्या 27 टक्के याप्रमाणे आरक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पन्नास सदस्यांच्या 27 टक्के म्हणजे ओबीसीसाठी तेरा जागा द्याव्या लागणार होत्या. सात ओबीसी जागा महिलांसाठी व सहा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. या आरक्षण सोडत प्रक्रियेमध्ये राजकीय समीकरणांची उलटफेर पाहायला मिळाली शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे बर्याच दिग्गजांना लगतच्या वार्डाचे पर्याय शोधावे लागतील. काही ठिकाणी आरक्षणामुळे काहीजणांना थांबण्याची वेळ आली आहे. असे बरेच उलटफेर या राजकीय समीकरणांमध्ये पहायला मिळाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सातारा पालिकेच्या होणाऱ्या निवडणूकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी १३ जागा आरक्षित करण्यात आल्या. या जागा आरक्षित झाल्याचा फटका साताऱ्यातील दिग्गजांना बसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अमोल मोहिते, अशोक मोने, किशोर शिंदे, जयेंद्र चव्हाण विजय काटवटे, सुजाता राजेमहाडिक, सिता हादगे सुहास राजेशिर्केयांच्यासह इतर दिग्गजांचा समावेश आहे.तर आरक्षण सोडतीमुळे रविंद्र ढोणे, वसंत लेवे , राजू गोरे यांना मात्र लॉटरी लागली आहे . काही दिग्गजांना धक्का बसल्याचे दिसत असले तरी उमेदवारी निश्चितीवेळी त्यांचे इतर प्रभागात पुर्नवसन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभाग क्रं अकरा व ते वीस येथून वसंत लेवे यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती . गुरुवार झालेल्या आरक्षण सोडतीने त्यांना कौल दिला त्यामुळे दोन्ही प्रभागातून त्यांना संधी आहे . प्रभाग क्रं 11 मध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे संजय लेवे यांना संधी देणार की अविनाश कदम यांना हा औत्सुक्याचा विषय आहे .उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा प्रभाग सात सर्वात मोठा असताना तो खुला झाला. तिथे शेंडे यांना याच गटातून पालिकेत यावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक 14 हा खुला झाल्याने स्मिता घोडके यांना याच गटातून नशीब आजमावावे लागेल. सातारा विकास आघाडीचे मार्गदर्शक अॅड दत्ता बनकर यांना प्रभाग16 व 18 या दोन्ही प्रभागात संधी आहे. 16 मध्ये महिला ओबीसी आरक्षण पडल्याने बनकर आपल्या प्रभाव क्षेत्रात ही जागा निवडून आणू शकतात . अठरामध्ये त्यांना मात्र मोठे अग्निदिव्य करावे लागेल. प्रभाग बारामध्ये जयेंद्र चव्हाण, किशोर शिंदे यांच्या राजकीय बांधणीवर पाणी पडले आहे . प्रभाग क्रं वीस मध्ये अमोल मोहिते तर एकवीस मध्ये सुजाता राजे महाडिक यांना थांबावे लागेल नाही तर श्री ऐवजी सौ आणि सौ ऐवजी श्री हा पर्याय पुढे आणावा लागेल याच प्रभागात अशोक मोने यांना खुल्या गटातून आखाड्यात यावे लागेल.
प्रभाग क्र 24 मध्ये रविंद्र ढोणे तर 25 मध्ये ओबीसी सर्वसाधारण मुळे राजू गोरे यांच्या मार्ग सेफ झाला आहे. वॉर्ड क्रमांक 22 मध्ये कल्याण राक्षे, विजय काटवटे, दिपाली गोडसे हर्षल चिकणे, धनंजय जांभळे, बाळासाहेब शिंदे असे अनेक राजकीय पर्याय आघाड्यांच्या माध्यमातून आजमावले जातील. प्रभाग क़मांक 25 मध्ये सुहास राजेशिर्के यांना ब्रेक घ्यावा लागेल अशी चिन्हे आहेत. प्रभाग क्रं ६ मध्ये ज्ञानेश्वर फरांदे यांना व लता पवार यांना मागास प्रवर्ग सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला या आरक्षणाची लॉटरी लागली आहे. मात्र त्यांना पुन्हा राजकीय संधी मिळणार का ? हा कळीचा मुद्दा आहे.
दरम्यान, अकरा पंचायत समित्यांसाठीचे आरक्षण त्या त्या पंचायत समिती कार्यालयात काढण्यात आले.


