साताऱ्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
बेंगलूरूतील आक्षेपार्ह घटनेचा साताऱ्यात निषेध
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्याची राजधानी असणाऱ्या बेंगलूरूमध्ये अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रासह मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या साताऱ्यात पडसाद उमटले.
सातारा : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्याची राजधानी असणाऱ्या बेंगलूरूमध्ये अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रासह मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या साताऱ्यात पडसाद उमटले.
येथील शिवतीर्थ वरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला शिवप्रेमींच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. अज्ञात समाजकंटकाना कठोर शासन करण्याची मागणी करत, शिवभक्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. शनिवारी सकाळी बेंगलूरूत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर अज्ञातांनी शाई ओतल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. राजधानी साताऱ्यात सुध्दा सतर्कता म्हणून पोवई नाक्यावर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. या घटनेच्या निषेधार्थ शिवभक्त एकत्र जमले आणि अत्यंत संयमी वातावरणात शिवप्रेमींनी शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक केला व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. असे विघातक कृत्य करणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा निषेध करत, शिवभक्तांनी त्यांना कठोर शासन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ही कारवाई न झाल्यास आगामी परिणामांना प्रशासन जवाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे. खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने सुध्दा या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.


