maharashtra

गंमत जंमत वाईनशॉपमधील चोरीप्रकरणी एका परप्रांतियास अटक

सातारा शहर डीबीची कारवाई : इतर परप्रांतिय आरोपींचा शोध सुरु

सातारा शहरातील राधिका रस्त्यावरील गंमत जंमत वाईन शॉपमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबीने उघड केला असून याप्रकरणी एका लोणावळा येथे जावून एका परप्रांतिय युवकास अटक करण्यात आली आहे. तपासात या घटनेतील अन्य चोरटे हे परराज्यातील असल्याचे समोर आले असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.

सातारा : सातारा शहरातील राधिका रस्त्यावरील गंमत जंमत वाईन शॉपमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबीने उघड केला असून याप्रकरणी एका लोणावळा येथे जावून एका परप्रांतिय युवकास अटक करण्यात आली आहे. तपासात या घटनेतील अन्य चोरटे हे परराज्यातील असल्याचे समोर आले असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.
अनस अनिस खान, (वय 21, रा. बेगमपूर, रहमलोगाव, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 जुलै 2023 मध्ये पहाटेच्या सुमारास सातारा शहरातील राधिका रस्त्यावर मार्केटयार्ड परिसरातील गंमत जंमत वाईन शॉपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानामध्ये चोरी केली होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या अनुषंगाने तपास सुरु असताना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे एका संशयिताची माहिती मिळाली.
सदरचा युवक उत्तर प्रदेशातून तो पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील अंमलदारांनी त्याचा लोणावळा येथे शोध घेवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ गुन्ह्यातील चोरी केलेला मोबाईल मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. तपासामध्ये परराज्यातील चोरटे असल्याचे समजून आले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, सातारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सुर्यवंशी, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजित भोसले, निलेश जाधव, किशोर जाधव पो.ना. पंकज मोहिते पो. कॉ. संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, इरफान मुलाणी, सचिन रिटे, संतोष कचरे, सुशांत कदम यांनी केलेली आहे.