maharashtra

एम.बी.बी.एस ला प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तब्बल ४५ लाखांची फसवणूक

मायणीच्या आय. एस. एन. आर. कॉलेजच्या प्रमुखासह आणखी एकावर गुन्हा

Fraud of Rs 45 lakh for claiming admission to MBBS
मुंबईतील एका महिलेच्या मुलीला एम.बी.बी.एस ला प्रवेश मिळवून देतो असे सांगून पाच वर्षांपूर्वी तब्बल ४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील एक आणि सातारा जिल्ह्यातील मायणी येथील आय. एस. एन. आर. या कॉलेजचे प्रमुख देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पुसेगाव : मुंबईतील एका महिलेच्या मुलीला एम.बी.बी.एस ला प्रवेश मिळवून देतो असे सांगून पाच वर्षांपूर्वी तब्बल ४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील एक आणि सातारा जिल्ह्यातील मायणी येथील आय. एस. एन. आर. या कॉलेजचे प्रमुख देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीसांच्या खंडणीविरोधी पथकाने किरण सुवर्णा याला अटक केली आहे. देशमुख यांना शोधण्यासाठी पोलीसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.
घटनेबाबत ग्यानदेवी अनिलकुमार ओझा (वय ४२, रा. चांदीवली, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ ऑगस्ट २०१६ ते २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत त्यांची वेळोवेळी फसवणूक करण्यात आली. २०१५ मध्ये ओझा यांच्या मुलीने १२ वी पास होवून मेडिकल प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा दिली होती. ओझा यांची पिंपरी येथील नणंद तिवारी यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांची किरण सुवर्णा आणि संगिता सुवर्णा यांच्याशी ओळख झाली. सुवर्णा यांनी ओझा यांना तुमच्या मुलीचे मेडिकल ॲडमिशन करुन देतो, १० लाख रुपये घेऊन पुण्याला या, असे सांगितले. दि. ७ ऑगस्ट २०१६ रोजी ओझा यांनी सुवर्णा यांना सर्वासमक्ष १० लाख रुपये दिले. त्यावेळीही सुवर्णा यांनी प्रवेश मिळवून देतो, असे खात्रीपूर्वक सांगितले होते. त्यानंतर फोन केला असता सुवर्णा यांनी मेडिकल प्रवेश अद्याप सुरु झाले नाहीत, असे ओझा यांना सांगितले होते. त्यानंतर सुवर्णा यांनी ओझा यांना मुलीच्या प्रवेशाबाबत सातारा जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजबरोबर बोलणे झाले आहे, ३५ लाख रुपये घेऊन या, असे सांगितले. पुणे येथून ओझा आणि किरण सुवर्णा मायणी येथील मेडिकल कॉलेज या ठिकाणी आले. ओझा यांना बाहेर थांबवून सुवर्णा यांनी ३५ लाख रुपये घेऊन कॉलेजमध्ये गेले. अर्ध्या तासाने बाहेर येवून ओझा यांना तुमचा प्रवेश झाला आहे, असे सांगितले. ओझा यांनी पैसे दिल्याची पावती किंवा पुरावा मागितल्यावर सुवर्णा यांनी तो कॉलेज बोर्ड मेंबर असल्याचे सांगून आयकार्ड दाखविले. त्यावरील माहिती पाहून सुवर्णा हे शासनाने नियुक्त केले असल्याचा ओझा यांचा समज झाला. त्यानंतर अनेक दिवस होवूनही ओझा यांच्या मुलीला कॉलेजकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सुवर्णा यांच्याकडे दिलेल्या पैशांची मागणी केली. कॉलेजची केस चालू आहे, लवकरच तुमचे काम होईल, असे सुवर्णा यांनी ओझा यांना सांगितले. वारंवार तगादा लावल्यावर सुवर्णा यांनी ओझा यांना मायणी येथे आणून देशमुख यांच्याशी ओळख करुन दिली. देशमुख यांनी आमचेकडे प्रवेशाचे ३० लाख रुपये आहेत ते परत करु, असे ओझा यांना सांगितले. त्यानंतर २२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा ओझा यांनी देशमुख यांची भेट घेतली आणि पैशांची मागणी केली. देशमुख यांनी तेव्हाही पैसे देण्याचे अश्वासन दिले होते. त्यानंतर अनेकवेळा संपर्क करुनही ओझा यांचे पैसे परत मिळाले नाहीत म्हणून ४५ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीसांत दिली.
ओझा यांच्या तक्रारीनंतर पोलीसांनी सुवर्णा याला ताब्यात घेतले असून देशमुख यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.
मेडिकल प्रवेशाबाबत साताऱ्यात फसवणूक झाल्याची तक्रार पिंपरी चिंचवड पोलीसात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आणखी काही प्रकरणे लवकरच बाहेर येणार असल्याची चर्चाही जिल्ह्यात सुरु झाली आहे.