पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. भारत कमलाकर जाधव, वय २७, रा. प्रतापगंज पेठ, सातारा असे त्याचे नाव आहे.
सातारा : पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. भारत कमलाकर जाधव, वय २७, रा. प्रतापगंज पेठ, सातारा असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भारत कमलाकर जाधव, वय २७, हा पत्नी सौ. श्रद्धा भारत जाधव हिच्यासमवेत प्रतापगंज पेठ, सातारा येथे वास्तव्य करत होता. पती-पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे. दि. २७ जानेवारी २०१८ रोजी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास वरील कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले. त्यावेळी भारत जाधव याने धारदार कोयत्याने पत्नी श्रद्धा हिच्या मानेवर वार केला. पत्नी बचावासाठी रस्त्यावरून धावत असताना तिचा पाठलाग करून भारत याने पुन्हा तिच्यावर वार केले, यात तिचा मृत्यू झाला. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.
या गुन्ह्याचा तपास शाहूपुरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायालयात पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. सी मोरे यांच्या न्यायालयात झाली. यावेळी ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व पुराव्याच्या आधारे भारत जाधव याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून महेश कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. त्यांना पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, शुभांगी भोसले, शमशुद्दीन शेख, जी. एच. फरांदे, राजेद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी या खटल्या संदर्भात विशेष सहकार्य केले.


