दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता
पोलिसांनी संबंधितांच्या पालकांना बोलावून काढली मुलांची खरडपट्टी
सातारा शहरातील दहावीतील मुलांनी कोयत्याचा धाक दाखवण्यासाठी तो क्लासमध्ये नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेवून संशयितांकडून तो कोयता सॅकमधून जप्त करण्यात आला.
सातारा : सातारा शहरातील दहावीतील मुलांनी कोयत्याचा धाक दाखवण्यासाठी तो क्लासमध्ये नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेवून संशयितांकडून तो कोयता सॅकमधून जप्त करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पालकांनी वेळीच सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना बुधवारी घडली आहे. दहावीत शिकत असलेल्या काही पोरांची धुसफूस सुरु आहे. खुन्नसने पाहिल्याने सज्जड दम भरण्यासाठी चार ते पाच मुले एकत्र आली. ज्याला दम भरायचा आहे तोही दहावीतला. शाळेच्या आवारात राडा करण्याऐवजी बाहेरचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यासाठी क्लास हे ठिकाण ठरल्यानंतर एकाने क्लाससाठी लागणार्या वह्या पुस्तकांऐवजी सॅकमध्ये कोयता घेतला.
क्लासमध्ये आल्यानंतर कोयत्याने धाक दाखवण्याची तयारी सुरु असतानाच क्लासमध्ये कोयता असल्याचे बिंग फुटले. यामुळे ज्या मुलाने कोयता आणला होता त्याला घाम फुटला. कोयता कोणाला दिसू नये यासाठी इतर त्याच्या चार ते पाच सहकार्यांनी कोयत्याची पळवापळवी करण्यासाठी मदत केली. अखेर ही बाब समोर आल्यानंतर याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यापर्यंत गेली.
गुरुवारी दुपारपासून कोयता प्रकरणी संबंधित मुलांची माहिती घेण्यात आली. ती मुले सातार्यातील वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकत होती. संबंधितांची गचांडी पकडून त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी कोयता आणल्याच्या कृत्याची कबुली दिली. मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांना बोलावून मुलांची खरडपट्टी काढण्यात आली.


