सातारा जिल्हा पोलीस दलाकडून गड भ्रमंती व स्वच्छता मोहिमेंतर्गत किल्ले वैराटगडाची स्वच्छता
दि.5 फेब्रुवारी रोजी आपले किल्ले आपली जबाबदारी अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले वैराटगड या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वाई उपविभागातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज व मेढा या पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
सातारा : दि.5 फेब्रुवारी रोजी आपले किल्ले आपली जबाबदारी अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले वैराटगड या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वाई उपविभागातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज व मेढा या पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे या मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते.
या मोहिमेदरम्यान किल्ले वैराटगडाच्या पायथा येथील भवानी माता मंदिर, आसले येथे एकत्रीत येवून चढाई (ट्रेक) करण्यात आली. तसेच समुह तयार करुन किल्ले वैराटगड येथे नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेदरम्यान पाण्याने भरलेला तलाव, कोरडा तलाव, किल्ल्यावरील झाडे-झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. मोहिमेदरम्यान जैविक व अजैविक अंदाजे 80 किलो कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर वैराटेश्वर मंदीर सभा मंडपात राहुल गोळे, वैराटेश्वर प्रतिष्ठान, व्याजवाडी व रोहन भोसले, भुईंज यांनी वैराटगडाबद्दल व गड संवर्धनाबद्दल माहिती दिली.
या मोहिमेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शितल जानवे, वाईचे पो.नि. बी. एस. भरणे, भुईंज पो.ठाण्याचे स.पो.नि. आर. एस. गर्जे, एस.व्ही. तासगावकर स.पो.नि.मेढा पो.ठाणे, आर.जे.माने स.पो.नि. पाचगणी पो.ठाणे, बिद्री, पो.उ.नि. महाबळेश्वर पो. ठाणे असे 12 पोलीस अधिकारी, 70 पोलीस अंमलदार व 115 नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.
दिनांक 15/01/2023 रोजी पासून सातारा पोलीस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली जबाबदारी मोहिमेअंतर्गत 1) अजिंक्यतारा (दि.15/01/2023), 2) वसंतगड (दि.22/01/ 2023), 3) जरंडेश्वर (दि.29/01/2023), 4) वैराटगड (दि.05/02/2023) या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असून मोहिमेत आजअखेर 60 पोलीस अधिकारी, 369 पोलीस अंमलदार, 690 नागरीक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकुण अंदाजे 544 किलो कचरा गोळा करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्ह्यातील एक किल्ला निवडून ही मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.


