maharashtra

मांडूळ व कासव विक्री करणार्‍या चौघांना अटक

ओगलेवाडी येथे सातारा वनविभागाची कारवाई

Four arrested for selling foreheads and turtles
मांडूळ व दुर्मिळ कासव तस्करी करणार्‍या चौघांना जेरबंद करण्यात सातारा वनविभागाला यश आले आहे. ही कारवाई ओगलेवाडी, ता. कराड येथे करण्यात आली.

कराड : मांडूळ व दुर्मिळ कासव तस्करी करणार्‍या चौघांना जेरबंद करण्यात सातारा वनविभागाला यश आले आहे. ही कारवाई ओगलेवाडी, ता. कराड येथे करण्यात आली.
रोहित साधु साठे (वय 20), प्रशांत रामचंद्र रसाळ (वय 20), अविनाश आप्पा खुडे (वय 21 तिघेही रा. अकलूज, ता.माळशिरस, जि. सोलापूर), सुनील तानाजी सावंत (वय 28, रा.दिवड, ता.माण, जि. सातारा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दि. 17 रोजी सकाळी काही लोक हे कराड (राजमाची-ओगलेवाडी) येथे काही जिवंत वन्यजीव मांडूळ व दुर्मिळ कासव हे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीपूर्वक गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. दुपारी 1.30 वाजता संशयित चौघे हे दोन दुचाकी वरून येवून राजमाची(ओगलेवाडी) येथे सांज सावली या हॉटेलमध्ये जेवण करीत बसले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या.
यावेळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुण, मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनरक्षक विजय भोसले फिरते पथक सातारा यांनी हॉटेलमध्ये आत जाऊन या संशयास्पद 4 जणांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ एका पिशवीत जिवंत कासव व एका पिशवीत एक जिवंत मांडूळ मिळून आले. हे कासव (इंडियन सॉफ्ट शेल्ड टरटल) व मांडुळ (कॉमन सॅनड बोआ) हे प्राणी वन्यजीव (संरक्षण)अधिनियम 1972 अंतर्गत शेड्युल 1 भाग 2 व शेड्युल 4 मध्ये येते. त्याला पकडणे, बाळगणे, विक्री करणे, मारणे हा वन्यजीव कायद्याने गुन्हा आहे.
या चारही आरोपींंना अटक करून त्यांच्या दुचाकी गाड्या एमएच 12 डीपी 3691 स्प्लेंडर व एक विना नंबरची कावासाकी बजाज बॉक्सर तसेच 4 मोबाईल संच, दोन जिवंत वन्यजीव प्राणी हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश  झांजुर्णे, मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनपाल ए. पी.सावखंडे, बाबुराव कदम, वनरक्षक उत्तम पांढरे, विजय भोसले, रमेश जाधवर, अरुण सोलंकी, वनपाल कोळे, सचिन खंडागळे, श्रीकांत चव्हाण, हणमंत मिठारे, सुनीता जादव, दीपाली अवघड, शीतल पाटील यांनी केली आहे.