थकबाकीदाराच्या खाजगी मिळकत क्षेत्रात सातारा पालिकेचे डांबरीकरण
बड्या धेंडांवर राजकीय मेहेरनजर कोणाची ?
सातारा पालिकेचे तब्बल सव्वा कोटी रूपये थकविणार्या पोवई नाक्यावरील एका बड्या व्यावसायिकाच्या मिळकत क्षेत्रातील खाजगी रस्त्याचे डांबरीकरण पालिकेने स्वखर्चाने करण्याचा प्रताप दाखविला आहे. बांधकाम विभागाने या प्रकरणावर चुप्पी साधली आहे,. काळ्या कोटाच्या दबावातून हे लांगुलचालन करण्यात आल्याची चर्चा आहे.
सातारा : सातारा पालिकेचे तब्बल सव्वा कोटी रूपये थकविणार्या पोवई नाक्यावरील एका बड्या व्यावसायिकाच्या मिळकत क्षेत्रातील खाजगी रस्त्याचे डांबरीकरण पालिकेने स्वखर्चाने करण्याचा प्रताप दाखविला आहे. बांधकाम विभागाने या प्रकरणावर चुप्पी साधली आहे,. काळ्या कोटाच्या दबावातून हे लांगुलचालन करण्यात आल्याची चर्चा आहे.
बड्या धेंडांसाठी जो झपाटा सातारा पालिकेने दाखविला तो सामान्यं सातारकरांसाठी सुध्दा दाखवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सातारा पालिका आपल्या दावणीला बांधल्याप्रमाणे काही राजकीय चाणक्यांचे वर्तन आहे. राजकीय वरदहस्तामुळे या महाभागांच्या राजकीय मखलाशी पुढे कोणत्याही कर्मचार्याची तोंड उघडायची टाप नसते. अशाच राजकीय दबावातून पालिकेने पोवई नाक्यावरील बड्या व्यावसायिकाच्या खाजगी मिळकत क्षेत्रातील रस्त्यावर डांबर टाकण्याचा पराक्रम केला. हे काम रात्री उशिरा सुरू करून अगदी रातोरात उरकण्यात आले. एवढेच नव्हे तर या व्यावसायिकाच्या इमारतीला धोकादायक ठरणारी दोन मोठी झाडे कोणत्याही पंचनाम्याशिवाय बुंध्यातून तोडण्यात आली. पालिका प्रशासन सुद्धा सत्ताधार्यांच्या दावणीला बांधल्याप्रमाणे वागत आहे. ज्या व्यावसायिकाने पालिकेची सव्वा कोटी रुपयाची थकबाकी थकविलेली आहे त्यांच्यावर ही मेहेरनजर कशासाठी? हा संतप्त सवाल सातारकरांचा आहे. या व्यावसायिकाच्या मिळकत क्षेत्रात नक्की किती भाडेकरू वास्तव्यास आहेत, याची निश्चित नोंद चतुर्थ वार्षिक पाहणीच्या निमित्ताने होणार्या नोंद पत्रकावर आलेली नाही. या प्रकरणावर पालिकेच्या बांधकाम विभागाने चुप्पी साधली आहे. आजतागायत या महाभागाला पालिकेने घरपट्टी थकविली म्हणून शास्ती लगावण्याचे धाडस राजकीय दबावातून दाखविलेले नाही.
चौदा वर्षापूर्वी या व्यावसायिकाच्या रस्त्यातील अतिक्रमणाला हात घालण्याचे धाडस दाखविले होते तेव्हा एका पदाधिकार्याने केलेला राजकीय थयथयाट आणि त्यातून उडालेला गदारोळ संपूर्ण सातार्याने पाहिला. संबधित अधिकार्याची सेवा राजकीय हेतूने पालिका शिक्षण मंडळात वर्ग करण्यात आली. विरोधी नगर विकास आघाडीने सुध्दा सत्ताधार्यांच्या आणि प्रशासनातील अनेक गैरप्रकारांवर सोयीचा विरोध तर कधी सोयीची हातमिळवणी ही धरसोड पाच वर्ष कायमच ठेवली. त्यामुळे सातार्यात हे असचं चालायचं, असे स्वतःलाच बोल लावायची पाळी सातारकरांवर ओढविली आहे.
प्रशासक कारवाई करणार का ?
प्रशासक म्हणून सातारा पालिकेचा कारभार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या हातात आहे. खाजगी मिळकत क्षेत्रातील डांबरीकरण प्रकरणावर सार्वजनिक बांधकाम विभाग वर कारवाई करणार का ? हे सातारकरांनी परखडपणे विचारण्याची गरज आहे. बापट साहेबांनी राजकीय दबाव झुगारून या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


