रहिमतपूर नजिकच्या टकले-बोरगाव येथील मोटारसायकल चोर जेरबंद
जिल्ह्यातून चोरलेल्या चार मोटारसायकली जप्त
रहिमतपूरनजिकच्या टकले -बोरगाव येथील मोटारसायकल चोर प्रतिक नारायण पवार वय २० याला कोरेगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने जिल्ह्याच्या विविध भागातून चार मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चारही मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
कोरेगाव : रहिमतपूरनजिकच्या टकले -बोरगाव येथील मोटारसायकल चोर प्रतिक नारायण पवार वय २० याला कोरेगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने जिल्ह्याच्या विविध भागातून चार मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चारही मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की सातारा जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने, मोटार सायकल चोरट्यांना जेरबंद करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार कोरेगाव उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस सक्त आदेश दिले होते.
दरम्यानच्या काळात पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांना माहिती मिळाली की, टकले -बोरगाव येथील प्रतिक नारायण पवार हा चोरीची मोटारसायकल वापरत आहे, त्यांनी तात्काळ उपनिरीक्षक विशाल कदम, अंमलदार सचिन साळुंखे, प्रमोद जाधव, अविनाश घाडगे, समाधान गाढवे, समाधान शेडगे, अमोल धनवडे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी प्रतिक पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून एक पल्सर, दोन डिस्कव्हर व एक स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. कोरेगावसह बोरगाव, औंध व सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या मोटारसायकली चोरल्याचे उघडकीस आले आहे.
ही कारवाई करणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी अभिनंदन केले आहे.


