दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या सोन्याचा शोध
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आले यश; एकाला अटक
सैदापूर येथे राहणारे आणि सैन्य दलातून निवृत्त झालेले लष्करी अधिकारी २0१९ मध्ये मुंबइला गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी परवाना असलेले पिस्टल, सोन्याचा राणीहार, लक्ष्मीहार असा सुमारे ३.२१ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यत तक्रार दाखल झाल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला होता.
सातारा : सातारा तालुक्यातील सैदापूर येथे राहणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरातून दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेले अडीच लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले असून अनिल नागराज गोसावी (वय ३५, रा. यशवंतनगर, सैदापूर, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, सैदापूर येथे राहणारे आणि सैन्य दलातून निवृत्त झालेले लष्करी अधिकारी २0१९ मध्ये मुंबइला गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी परवाना असलेले पिस्टल, सोन्याचा राणीहार, लक्ष्मीहार असा सुमारे ३.२१ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यत तक्रार दाखल झाल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, हा गुन्हा सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोवीस तासात उघड केला होता. यावेळी पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातून पिस्टल व अन्य साहित्य जप्त केले होते. मात्र, सोन्याचे दागिने आणि रोकड हस्तगत करता आली नव्हती. त्या अनुषंगाने तपास सुरु होता.
दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास सुरु असतानाच सैदापुर येथे राहणारा अनिल नागराज गोसावी हा चोरी झाल्यापासून गाव सोडून गेला होता. याची माहिती एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अनिल गोसावी याच्यावर वॉच ठेवला होता. मात्र, तो आढळून येत नव्हता. मात्र, अनिल गोसावी हा त्याच्या भाचीचे लग्न असल्याने सैदापूर येथे येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाल्यानंतर त्याला तत्काळ अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने संबंधित घरफोडीची माहिती दिली. यातील सोने त्याने एका सराफाला विकले होते, तर काही दुसऱ्याकडे गहाण ठेवले होते. पोलिसांनी संबंधित सराफाकडून ५१ ग्रॅम सोने हस्तगत केले.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विश्वनाथ संकपाळ, संतोष सपकाळ, लक्ष्मण जगधने, पोलीस नाईक अमोल माने, शिवाजी भिसे, गणेश कापरे, कॉन्स्टेबल सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, चालक शिवाजी गुरव, गणेश कचरे सहभागी झाले होते.


