maharashtra

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स रयत ने सुरू करावा

खासदार शरद पवार यांच्या हस्ते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन

Artificial Intelligence course should be started by Rayat
रयत शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार शरद पवार यांनी येथे केले. पवार म्हणाले आधूनिकतेची कास रयतला पहिल्यापासून आहे. डाॅ. अनिल पाटील यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोर्ससाठी तातडीने प्रयत्न सुरु करावेत.

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार शरद पवार यांनी येथे केले. पवार म्हणाले आधूनिकतेची कास रयतला पहिल्यापासून आहे. डाॅ. अनिल पाटील यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोर्ससाठी तातडीने प्रयत्न सुरु करावेत. त्यासाठी लागेल ती मदत मी आणि रामशेठ ठाकूर देऊ, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा छत्रपती शिवाजी काॅलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार  हे साता-यात आले होते. व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, सदस्य रामशेठ ठाकूर, कायदेशीर सल्लागार अॅड. दिलावर मुल्ला, प्राचार्य डाॅ. विठ्ठल शिवणकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वामुळे रयत शिक्षण संस्थेमधील अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यास मदत होत आहे, असे नमूद केले. दरम्यान पवार यांच्या हस्ते नूतन इमारतीसाठी देणगी दिलेल्या मान्यवरांचा, सातारा पालिकेच्या माजी नगरसेविका दीपाली गोडसे, माणदेशच्या प्रा. कविता म्हेत्रे यांचा सत्कार करण्यात आला.

एक मत विरोधात गेले आणि अटलबिहारी सरकार पडले : खासदार श्रीनिवास पाटील
अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधात 1999 साली शेतकरी कामगार पक्षाचे खासदार रामशेठ ठाकूर यांचे एक मत आदरणीय शरद पवार यांच्या सांगण्यावरून विरोधात गेले अन् सरकार पडले. तेव्हा शरद पवारांच्या शब्दात किती ताकद आहे, हे कळते आणि प्रधानमंत्री घरी गेले, असे सांगत भाजपा सरकार कोसळण्यातील एक खुलासा सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केला.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, रामशेठ होते त्यांचे एक मत होते. आदरणीय पवार साहेब यांच्या सांगण्यावरून ते एक मत बाजूला गेले आणि अटलबिहारी हे गादीवरून खाली उतरले. तेव्हा त्याच्या शब्दात किती ताकद आहे. एकलव्याला शिकवले नाही, मात्र द्रोणाचार्यचा पुतळा केला आणि बाण बरोबर मारला. त्याच रामाने आज जे वैभव उभे केले. आज माझ्या मित्राला पुरस्कार मिळाला, बघायला मिळाला आनंद झाला.

चंद्रकांतदादा घोषित राष्ट्रपती राजवटीला आमच्या शुभेच्छा
विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांनी दोन वेळा निवडणुकीच्या तारखा देवुन सुद्धा महाआघाडी सरकारने निवडणूक घेतली नाही. हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे आणि याच एका मुद्द्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागु शकते, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी माझ्या त्यांना शुभेच्छा असल्याचे येथे म्हटलं.

कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल, या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार स्थिर आहे. जे अस्वस्थ आहेत त्यांच्याकडून अशी विधाने होत आहेत. याआधी सुद्धा अशी विधानं केली गेली. ती महाराष्ट्राने ऐकली. त्याचा काही परिणाम झाला नाही. अशी विधाने आम्ही गांभीर्याने घेत नाहीत असा टोला पवारांनी पाटलांना लगावला.