maharashtra

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा साताऱ्यात मोर्चा

शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

विविध मागण्यांसाठी पुणे बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले .

सातारा : पुणे-बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला खाजगी वाटाघाटीने एकरी दोन कोटी किंवा चालू बाजारभावाच्या दहापट मोबदला मिळावा, बाधित क्षेत्रातील बांधकामे, विहिरी, बोअरवेल, पाईपलाईन, फळझाडे, फळबागा यांचे चालू बाजारभावाप्रमाणे योग्य मूल्यांकन करून त्याच्या चारपट मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी पुणे बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले .
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य संघटक भाई दिगंबर कांबळे, जिल्हाध्यक्ष ॲड. समीर देसाई, समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे व शेतकरी उपस्थित होते.
पुणे-बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे हा महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातून जाणार असल्याची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, कोरेगाव, खटाव या चार तालुक्यातील साठ गावांमधून जाणार आहे. त्यासाठीचे मार्किंग दगड लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्येक गावातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत ग्रीनफिल्ड हायवेचे कसलेही काम कुठल्याही बाधित गावच्या हद्दीत सुरू करू नये, महामार्ग बाधित शेतकऱ्यांना वहिवाटीप्रमाणे निवाडा नोटीस द्यावी. वहिवाट ठरवण्यासाठी शासकीय कमिटी नेमावी. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मोजणी करण्यापूर्वी चार दिवस अगोदर बाधित शेतकऱ्यांना लिखित स्वरूपात निरोप द्यावा, आदी मागण्या‌ मान्य न करता दडपशाहीने महामार्गाचे कसलेही काम सुरू केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.